गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संपूर्ण गीत रामायण; कथानकासह 56 गीते ऐका येत्या बुधवारी!
आनंद माडगूळकर, श्रेया माडगूळकर-सरपोतदार, मनिषा निश्चल यांचे सहकलाकारांसह सादरीकरण!!
पुणे : आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर रचित आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीत रामायणातील संपूर्ण 56 गीते कथानकासह ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. हा अभुतपूर्व सोहळा बुधवारी (दि. 23) आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण गीत रामायण एका दिवसात सादर करण्याची किमयाही सांस्कृतिक नगरीत पहिल्यांदाच घडणार आहे.
आनंद माडगूळकर
या कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रस्तुती महक कॉन्सर्टस् ॲण्ड इव्हेंटस्च्या संचालिका मनिषा निश्चल यांची असून हा कार्यक्रम बुधवार दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दिवसभर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. रामचरितमानस या गौरव ग्रंथाचे रचियते गोस्वामी तुलसीदास जयंती आणि श्रावणमास पुण्य पर्वानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनिषा निश्चल यांनी दिली.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून काही जागा आरक्षित आहेत.
गदिमा यांचे सुपुत्र आनंद माडगूळकर हे मध्यवर्ती भूमिकेत असून ते गीत रामायणाच्या निरूपणासह 18 ते 20 गीते सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकर यांच्या कन्या श्रेया माडगूळकर-सरपोतदार यांचाही कार्यक्रमात सहभाग असणार असून रामायणातील स्त्रीपात्रांमुखी असलेल्या गीतांपैकी सहा ते सात गीते त्या सादर करणार आहेत.
पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या गायनशैलीने वेगळा ठसा निर्माण केलेल्या मनिषा निश्चल या स्त्रीपात्रांमुखी असलेली 17 ते 18 गीते सादर करणार आहेत. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांना गीत रामायणात साथ केलेले ज्येष्ठ गायक प्रमोद रानडे यांचाही कार्यक्रमात सहभाग असणार असून त्यांच्यासह प्रणव कुलकर्णी, मनोज कान्हेगांवकर आणि वंडरबॉय पृथ्वीराज हे काही गीते सादर करणार आहेत.
केदार परांजपे हे वाद्यवृंद संयोजन करणार असून अमृता ठाकूरदेसाई, प्रणव कुलकर्णी, विशाल गंड्रतवार साथसंगत करणार आहेत.
जाहिरात