गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘मेलांज’ मैफलीत रसिकांची ब्रह्मानंदी टाळी..!
डॉ. प्रवीण गोडखिंडी, आनंद भाटे यांच्या सादरीकरणाला रसिकांची दाद !!
पुणे : आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविलेले डॉ. प्रवीण गोडखिंडी यांनी तंत्र कारी अन् गायकी अंगाने सादर केलेले बासरी वादन तर आनंदगंधर्व आनंद भाटे यांनी परंपरागत तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या बंदिशींची पेशकश रसिकांसाठी आनंदाचा ठेवा ठरले. कलाकारांच्या प्रस्तुतीला रसिकांनीही उभे राहून टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली हे या मैफलीचे आणखी एक वैशिष्ट्य.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या विविध भागातील नावाजलेल्या कलाकारांना ऐकण्याची संधी पुणेकर रसिकांना उपलब्ध करून देणे हा ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्चा उद्देश. ‘मेलांज’ या अशाच अनोख्या उपक्रमाअंतर्गत प्रसिद्ध बासरीवादक डॉ. प्रवीण गोडखिंडी आणि आनंदगंधर्व आनंद भाटे यांच्या मैफलीचे कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् येथे आयोजन करण्यात आले होतते.
मेलांज’ मैफलीत भरत कामत, माऊली टाकळकर, आनंद भाटे, सुयोग कुंडलकर.
हिंदुस्थानी बासरीवादनात डॉ. प्रवीण गोडखिंडी यांनी आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे याची अनुभूती रसिकांना ‘मेलांज’ मैफलीत आली. डॉ. गोडखिंडी यांनी आपल्य्ाा सादरीकरणाची सुरुवात राग मारवाने केली. त्यात त्यांनी विलंबित एकताल आणि द्रुत तीनतालात रचना सादर केल्या. किराणा घराण्याच्या गायकीचे दर्शन त्यांच्या बासरीवादनातून झाले. त्यानंतर ‘लतांगी’ हा शास्त्रीय संगीतातील मधुर राग सादर केला. कल्याण आणि पुरिया धनाश्री रागांचा मेळ साधत केलेले बासरीवादन रसिकांना विशेष भावले.
नऊ मात्रेतील रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली. डॉ. गोडखिंडी यांना सत्यजित तळवलकर यांनी दमदार तबलासाथ केली.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आनंद भाटे यांचे गायन झाले. पुरियाकल्याणमधील पारंपरिक रचनेने त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. ‘बहुत दिन बिते’ या रचनेनंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या सादरीकरणातून अजरामर केलेली ‘धन धन भाग सुहाग तेरो’ ही रचना सादरक करून भाटे रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मेलांज’ मैफलीत सत्यजित तळवलकर आणि डॉ. प्रवीण गोडखिंडी.
रसिकांच्याआग्रहाखातर ‘मन हो राम रंगी रंगले’ या भजनानंतर ‘राधाधर मधुमिलिंद जय जय’ हे नाट्यगीत त्यांनी सादर केले.
‘जो भजे हरि को सदा’ या भैरवीतील सुप्रसिद्ध रचनेने आनंद भाटे यांनी मैफलीची सांगता केली. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिमय) आणि माऊली टाकळकर (टाळ) यांनी समर्पक साथसंगत केली.
कार्यक्रमास दुर्गेश चंदावरकर, नंदिनी चंदावरकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींचा सत्कार प्रविण कडले आणि चेतना कडले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता धारप यांनी केले.
जाहिरात