गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सुरेल तालवाद्यांनी रसिकांना घातली भुरळ!
लोक-तालवाद्य कचेरी’ला दाद : 40 वाद्यांचे एकत्रित सादरीकरण!
पुणे : भारतीय तसेच पाश्चात्य लोकसंगीतात वापरल्या जाणाऱ्या तालवाद्य वादनाचा साधलेला सुरेल मेळ रसिकांनी अनुभवला. निमित्त होते भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व मर्हाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ऱ्हिदम कोलाज’ अर्थात लोक-तालवाद्य कचेरी या कार्यक्रमाचे!
‘ऱ्हिदम कोलाज’ अर्थात लोक-तालवाद्य कचेरी कार्यक्रमात सादरीकरण करताना कलाकार.
गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात अलेल्या या अनोख्या कार्यक्रमातील तालवाद्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. लोककला सादर करताना वापरल्या जाणाऱ्या तब्बल 40 पारंपरिक तालवाद्यांचे एकत्रित सादरीकरण या निमित्ताने रसिकांना ऐकायला मिळाले. 20 कलाकारांचा या कार्यक्रमात सहभाग होता.
या कार्यक्रमाची संकल्पना होती प्रसिद्ध तबलावादक संजय करंदीकर यांची. भारतीय लोककलांमध्ये शंख, दिमडी, संबळ, खंजिरी, टाळ, मृदंग, एकतारी, ढोलक-ढोलकी याचा कशा पद्धतीने वापर केला जातो, संदेश वहनासाठी कशा पद्धतीने वाद्ये वाजविली जातात याची काही उदाहरणे सुरुवातीस करंदीकर यांनी दिली. लोकवाद्य वादनातील आणि शास्त्रीय वाद्य वादनातील तालमात्रांची सुसंगतताही त्यांनी उलगडून दाखविली.
भक्तीरचना, सुगम, चित्रपट संगीत आणि गझल सादरीकरणातील तालवाद्यांचे वेगळेपण अनुभवणे रसिकांसाठी आनंददायी ठरले. स्वतंत्र तबलावादन तसेच चोंडकं या कर्नाटकी वाद्याबरोबर दिमडी वादन, काहोन आणि दरबुकाची जुगलबंदी हे कार्यक्रमातील वेगळेपण ठरले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
प्रथमेश देवधर, मयूर जोशी, विनीत तिकोनकर, सारंग बुलबुले, सचिन माईणकर, सुजित लोहार, सोमनाथ तरटे, सुरज तरटे, गणेश बोज्जी, ओंकार घाडगे, अभिजित पंचभाई, चित्रा आपटे, दिप्ती कुलकर्णी, विनायक पवार यांचा या कार्यक्रमात सहभाग होता. तालवाद्य संयोजन नितीन सातव, रोहित जाधव आणि पवन अवचरे यांनी केले.
संजय करंदीकर यांना भारत सरकारचे सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस ॲण्ड ट्रेनिंग (सीसीआरटी) यांच्यातर्फे सिनिअर फेलोशिप प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या निमित्ताने करंदीकर यांचा माधवबुवा लिमये यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सुरुवातीस गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
जाहिरात