गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भावस्पर्शी काव्यातून घडले हरितसृजनाचे दर्शन !!
सृजन फाऊंडेशन आयोजित तीन दिवसीय सृजन महोत्सवाला सुरुवात !!
पुणे : सृजनाचा हरित आविष्कार असणाऱ्या झाडांनाही मन असते, भावभावना असतात, त्यांनाही आनंद होतो, दु:ख होते अशा विचारातून अनेक कवींनी रचलेल्या हृदयस्पर्शी कवितांचा अनोखा आविष्कार पुणेकरांनी आज अनुभवला. निमित्त होते सृजन महोत्सवाचे.
सृजन फाऊंडेशन आयोजित सृजन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी थोर कवींनी रचलेल्या झाडांच्या संवेदना दर्शविणाऱ्या कवितांचे प्रभावी सादरीकरण ‘झाडांच्या मनात जाऊ’ या अनोख्या कार्यक्रमातून करण्यात आले. अपूर्वा कुलकर्णी, गिरीश दातार, स्वराली जोशी यांचा कार्यक्रमात सहभाग होता. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे
सृजन फाऊंडेशन आयोजित सृजन महोत्सवात ‘झाडांच्या मनात जाऊ’ हा कार्यक्रम सादर करताना (डावीकडून) अपूर्वा कुलकर्णी, गिरीश दातार, स्वराली जोशी.
उद्या (दि. 14) अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी ‘दास्तान ए रामजी’ सादर करणार आहेत तर बुधवारी (दि. 15) सृजन-कोहिनूर गौरव पुरस्काराने नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल काटे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रास्ताविकात सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अधीश पायगुडे यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली तर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पोपटलाल शिंगवी यांनी कलाकारांचा सत्कार केला.
‘झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ’ या कवितेने सुरू झालेला हा भावस्पर्शी प्रवास उलगडताना गिरीश दातार आणि अपूर्वा कुलकर्णी यांनी कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. कधी अभिवाचनातून तर कधी गायनातून या कविता ऐकताना रसिक कधी गहिवरले तर कधी आनंदले. काही रचना स्वराली जोशी यांनी आपल्या सुमधूर आवाजात सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवत शब्दांना हिरवाईचे कोंदण दिले.
झाडांचे आत्मन दर्शविताना ‘सावलीच्या शाईत बुडाली झाडाची लेखणी’, ‘निळे अंजन डोळ्यात नभी घालती पाखरे’, ‘काळ्याभोर जमिनीच्या प्रसुतीची वेळ झाली; रिमझिम सुईणबाई तरातरा खाली आली’, ‘बिना बीज ये सारे हरेभरे जंगल कहाँ’, ‘सुखे दरख्तोंके बीच देख एक पतलिसी पगडंडी; मैने नन्ही पिढीसे कहाँ यही थी कभी गांव की नदी’, ‘मोहती हुई नदी को टुकुर टुकुर देखते है पेड’, ‘भय इथले संपत नाही’ ‘सतपुडा के घने जंगल’ अशा झाडे, आकाश, पक्षी, नदी, पाऊस, वारा यांच्या नात्यातील गुंफण दर्शवित अनेक थोर कवींच्या कविता ऐकताना रसिकांनी कलाकारांना भरभरून दाद दिली.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ग्रेस, नलेश पाटील, द. भा धामणस्कर, दासू वैद्य, शांताराम आठवले, नवनीत पांडे, भवानीप्रसाद मिश्र, सज्जाद अली, यतीशकुमार, चैतन्य दीक्षित, कुसुमाग्रज, कैफी आझमी, सौमित्र, श्याम खामकर, अरविंद जगताप, बा. भ. बोरकर, वसंत आबाजी डहाके आदींच्या रचना सादर करण्यात आल्या.
कार्यक्रमाविषयी बोलताना गिरीश दातार म्हणाले, झाडांनाही मन असते या गोष्टीबद्दल आपल्या मनात संवाद सुरू व्हावा या सर्जक हेतूने कार्यक्रमाची मांडणी करण्यात आली आहे.