गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रुग्णांच्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे ‘स्वास्थ्य संवाद’मधून मिळतील : डॉ. प्रमोद जोग
इंटरनेटद्वारे मिळालेल्या माहितीतून शहाणपण येत नाही !
डॉ. अविनाश भोंडवे लिखित ‘स्वास्थ्य संवाद’ या आरोग्य ज्ञानेश्वरीचे स्वागत होईल.
पुणे : रुग्ण रुग्णालयात येतात तेव्हा त्यांच्या मनावर दडपण असते. रुग्णांच्या मनातील बरेच प्रश्न त्यामुळे अनुत्तरीत राहतात. अशा अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे संवादाच्या शैलीतून आकारास आलेल्या ‘स्वास्थ्य संवाद’ या पुस्तकातून मिळणार आहेत. आरोग्याचे भान वाढविणाऱ्या ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’चे निश्चितच स्वागत होईल, असा विश्वास नामवंत बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग यांनी व्यक्त केला.
फॅमिली फिजिशियन आणि आय. एम. ए.चे माजी राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी आरोग्याच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित लिहिलेल्या ‘स्वास्थ्य संवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 6) नॅशलन इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅलमॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. जोग बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. भोंडवे यांच्यासह आडकर फौंडेशनेचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिताराजे पवार व्यासपीठावर होते.
डॉ. जोग पुढे म्हणाले, आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे आज इंटरनेटच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा पद्धतीने मिळविलेल्या माहितीद्वारे शहाणपण येते असे नाही. वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांना अनुभवातून शहाणपण येत असते. याच गोष्टी डॉ. भोंडवे यांनी पुस्तकरूपात वाचकांसमोर मांडल्या आहेत. प्रश्न-शंकांचे सोप्या भाषेत निराकरण करणे हा सुद्धा आरोग्य शिक्षणाचा भाग आहे.
स्वास्थ्य संवाद’ पुस्तक प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) ॲड. प्रमोद आडकर, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. श्रीकांत केळकर, डॉ. प्रमोद जोग, सुनिताराजे पवार, उद्धव कानडे.
डॉ. श्रीकांत केळकर म्हणाले, डॉ. भोंडवे यांनी कोरोनाकाळात लिखाणाद्वारे केलेली जनजागृती खूप मोलाची होती. त्यांनी आरोग्य विषयक प्रश्नांसंदर्भात केलेले विवेचन खूप उपयुक्त आहे.
लेखन प्रवासाविषयीची भूमिका मांडताना डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, परदेशातील नागरिकांपेक्षा भारतीय नागरिकांचे आरोग्यविषयक ज्ञान फार कमी आहे. शिक्षण घेत असताना पुस्तकात वाचायचे आणि परीक्षेच्या वेळी प्रश्नांची उत्तरे लिहायची अशी आपली शिक्षण पद्धती आहे.
केवळ जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारे आरोग्यविषयक ज्ञान दूर व्हावे, रुग्णांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक प्रश्नांची माहिती व्हावी, या उद्देशाने पुस्तक लिहिले आहे. देशातील नागरिक निरोगी राहिले तरच देश महासत्तेबरोबरच आरोग्यसंपन्नही होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविकासह मान्यवरांचे स्वागत केले. आभार ॲड. प्रमोद आडकर यांनी मानले तर सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
जाहिरात