गोल्डन आय न्यूज नेटवर्क
साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन
मुरलीधर मोहोळ करणार प्रकाशकांशी चर्चा !!
पुणे : सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुण्यातील संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. 2 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
संपर्क कार्यालय महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड येथे सुरू करण्यात येत आहे. संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी तर डॉ. सतिश देसाई पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी मुरलीधर मोहोळ प्रकाशकांचीही भेट घेणार आहेत, अशी माहिती सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
संमेलनाच्या सरकार्यवाहपदी नेमणूक केल्याबद्दलचे पत्र मंत्री मोहोळ यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांच्या हस्ते या वेळी देण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरातील सांस्कृतिक घडामोडींचे नियमित वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा सत्कार या प्रसंगी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.