संवादिनीचे उलगडणार ‘स्वर’. ‘सप्रेम’ अभिनव उपक्रमाचा शुभारंभ : पंडित प्रमोद मराठे यांच्या शिष्य परिवारातर्फे आयोजित गुरू अभिवादन सोहळ्यास सुरुवात
पुणे : शास्त्रीय, सुगम संगीतापासून ते नाट्यसंगीत इतकेच काय लावणी या कलाप्रकारात संवादिनीवादन कशा पद्धतीने होते याचा उलगडा प्रात्यक्षिके आणि चर्चासत्राद्वांरे रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
संवादिनी वादन कार्यक्रमात आशय कुलकर्णी, पंडित सुधांशू कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांच्या संकल्पनेतून ‘सप्रेम’ अर्थात ‘संवादिनी प्रेमी मंडळ’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
पंडित मराठे यांच्या शिष्य परिवारातर्फे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तीन दिवसीय गुरू अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात प्रसिद्ध सराफ वसंत नगरकर, पंडित सुधांशु कुलकर्णी आणि पंडित मराठे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात उद्घाटन आणि संवादिनी वादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या अभिनव उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी पंडित मराठे यांनी दोन लाख रुपये देणगी दिली असून दरवर्षी दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त देणगी देऊन वर्षभर विविध कार्यक्रम घेणार असल्याचे जाहीर केले.
या उपक्रमाअंतर्गत आगामी काळात फक्त पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागात स्वतंत्र संवादिनी वादन, शास्त्रीय, सुगम, नाट्यसंगीत आणि लावणी या कार्यक्रमांमध्ये संवादिनी किंवा ऑर्गन वादनाचे वेगळेपण या विषयी कार्यशाळा, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरू अभिवादन सोहळ्यात पंडित मराठे यांच्या शिष्यांचे एकल संवादिनी वादन झाले.
स्वरूप दिवाण याने राग झिंजोटी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. रिषभ हंगल याने भीमपलास, अंशूला मोरे हिने राग जोग सादर केला.
ऋषिकेश पुजारी याच्या वादनानंतर हर्षद काटदरे याने ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ ही भक्तीरचना संवादिनीवर सादर केली. या निमित्ताने युवा कलाकारांचे तयारीचे सादरीकरण ऐकायला मिळाले.
कार्यक्रमाचा समारोप पंडित सुधांशू कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी यांच्या संवादिनी सहवादनाने झाला. त्यांनी राग चक्रधर सादर केला. या वेळी बोलताना ते म्हणाले, संवादिनी वादकाला नेहमी मुख्य कलाकाराच्या शेजारी बसावे लागते; पण पंडित प्रमोद मराठे यांच्या प्रयत्नांमुळे वादकाचे मंचाच्या मध्यभागी बसण्याचे स्वप्न साकार झाले आहे. भविष्यात संगीत संमेलनांमध्ये संवादिनी वादकाला मध्यभागी बसण्याचे भाग्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रणव गुरव, अथर्व कागलकर आणि आशय कुलकर्णी यांनी तबलासाथ केली. कलाकारांचा सत्कार परिणिती मराठे यांनी केला. सुरुवातीस सौ. व श्री. वसंत नगरकर, पंडित सुधांशू कुलकर्णी, पंडित प्रमोद मराठे, परिणिती मराठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
जाहिरात
जाहिरात