गोल्डन आय न्यूज नेटवर्क
धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा : फत्तेचंद रांका
जनहित चॅरिटेबल ट्रस्टतर्फे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव
रक्तदान शिबिराचे आयोजन :
साकारली 35 फुटी भव्य रांगोळी :
शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
पुणे : छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी देश-धर्मासाठी आयुष्याचे बलिदान दिले. महाराजांचा इतिहास शालेय विद्यार्थ्यांपासून तरुणांपर्यंत पोहोचविला जावा, अशी अपेक्षा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी आज व्यक्त केली.
शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनांचे आयोजन करून ते शालेय विद्यार्थ्यांना दाखविले जावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
जनहित चॅरिटेबल ट्रस्टतर्फे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार जयंती उत्सव आज (दि. 1) सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. भरत नाट्य मंदिर परिसर आणि इतिहास संशोधन मंडळाच्या आवारात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर रक्तदान शिबिर, युद्ध शस्त्रास्त्रे व अवजारांच्या प्रदर्शनाचे तसेच राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) पुणेतर्फे महाराजांच्या 35 फुटी भव्य रांगोळीचे उद्घाटन रांका यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश ढमढरे, दीपक ढमढेरे, पियुष विजयकुमार शहा, निलेश खानेकर, रोहन जाधव, अजित जाधवराव, हेमंत तिरळे, वसंत खुटवळ, मयूर काळे आदी उपस्थित होते.
सुमारे 350 वर्षांपूर्वीच्या शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनात विविध तलवारी, कट्यार, भाले, खंजिर, बिचवा, वाघनखे, शिरस्त्राण, तोफा, तोफगोळे यांचा समावेश आहे. शिवगर्जना मर्दानी आखाडाचे अध्यक्ष हेमंत तिरळे यांनी प्रदर्शनाची माहिती दिली.
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित उपक्रमाची माहिती प्रकाश ढमढेरे यांनी प्रास्ताविकात दिली. सध्या पुणे शहरात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असल्याने रक्तदान शिबिराद्वारे एक हजार रक्तपिशव्या संकलित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात