गोल्डन आय न्यूज नेटवर्क :
गानवर्धन आयोजित गायन-वादन मैफलीतून भावविभोर वातावरणाची अनुभूती
कै. सुचेता नातू वाद्यवादन पुरस्कार युवा सतारवादक अनिरुद्ध जोशी यांना प्रदान
पुणे : युवा सतारवादक अनिरुद्ध जोशी यांनी सादर केलेला सुमधूर गावती राग आणि त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर यांनी मधुवंती रागातील ‘मोरे मन राम’ तसेच ‘मै आऊ तोरे मंदिरवा’ या बंदिशी रसिकांना भावविभोर वातावरणात घेऊन गेल्या. निमित्त होते गानवर्धन आयोजित सांगीतिक मैफलीचे.
फोटो ओळ : गानवर्धन आयोजित कै. सुचेता नातू वाद्यवादन पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) जयश्री रानडे, सुरेश रानडे, अनिरुद्ध जोशी, पंडित विजय कोपरकर, दयानंद घोटकर, रवींद्र दुर्वे
कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ आज (दि. 30) एस. एम. जोशी सभागृहात गायन आणि वादन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सुरेश व जयश्री रानडे पुरस्कृत कै. सुचेता नातू वाद्यवादन पुरस्कार पुण्यातील युवा सतारवादक अनिरुद्ध जोशी यांना पंडित विजय कोपरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, कार्यवाह रवींद्र दुर्वे, सुरेश रानडे, जयश्री रानडे स्वरमंचावर होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि दहा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. संगीताच्या क्षेत्रातील वाटचाल अखंडित सुरू राहावी यासाठी हा पुरस्कार आशीर्वाद ठरेल, अशा भावना अनिरुद्ध जोशी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अनिरुद्ध जोशी यांनी आपल्या सतारवादनाने आनंददायी स्वरानुभूती देत रसिकांना खिळवून ठेवले.
सतारवादनातून केलेले उत्कट भावप्रकटीकरण रसिकांना विशेषत्वाने भावले. त्यांना अभिजित बारटक्के यांनी समर्पक तबलासाथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित विजय कोपरकर यांची स्वरमैफल रंगली. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात मधुवंती रागातील ‘मोरे मन राम’ या बंदिशीन केली. त्यानंतर पंडित वसंतराव देशपांडे यांनी रचलेली अस्थायी आणि पंडित कुमार गंधर्व यांनी पूर्ण केलेला अंतरा असे वैशिष्ट्य असलेली ‘मै आऊ तोरे मंदिरवा’ ही बंदिश रसिकांना विशेष भावली.
त्यानंतर शंकर अभ्यंकर यांची ‘नैन जल बरसन लागे’ या बंदिशीने रसिकांना भावरसपूर्ण वातावरणात नेले. पंडित चंद्रकांत आपटे यांनी रचलेल्या ‘राखो मोरी लाज’ आणि ‘गगन दीप जले, तारांगन से आंगन सजे’ या बंदिशी सादर केल्यानंतर पंडित कोपरकर यांनी मैफलीचा समारोप ‘आज मै न.. अपने पिया को जाने ना दूँगी सैया’ या भैरवीने केला. पंडित कोपरकर यांना विवेक भालेराव (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम) आणि तेजस कोपरकर (तानपुरा आणि सहगायन) यांनी साथ केली.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी संस्थेच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. सुरेश व जयश्री रानडे यांचा सत्कार घोटकर यांच्या हस्ते करण्यात आला तर पंडित कोपरकर यांचा सत्कार सुरेश रानडे यांनी केला. कलाकारांचा सत्कार जयश्री रानडे, कार्याध्यक्ष वासंती ब्रह्मे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या कोषाध्यक्ष सविता हर्षे यांनी केले.
——————————————
जाहिरात
जाहिरात
जाहिरात