गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : संगीत नाटकाच्या निस्सिम चाहत्या श्रीमती विजयाताई देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शुक्रवार, दि. 12 मे रोजी कै. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत स्वयंवर या नाटकाचा प्रयोग संगीतनाट्य रसिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे.
संगीत स्वयंवर या नाटकाचा प्रयोग दुपारी 4:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार असल्याची माहिती देशपांडे यांच्या कन्या आणि गद्य रंगभूमीवर 25 वर्षे कार्यरत असलेल्या अभिनेत्री अवंती बायस यांनी निवेदनाद्वारे दिली. डॉ. हिमानी तपस्वी यांची प्रमुख उपस्थिती असणार असून संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
‘कलाद्वयी’ संस्थेची निर्मिती असलेल्या संगीत स्वयंवर या नाटकातील अवीट गोडीची आणि देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांनी संगीत दिलेली नाट्यपदे रसिकांना प्रदीर्घ कालावधीनंतर ऐकायला मिळणार आहेत.
चिन्मय जोगळेकर, संजय गोसावी, सुदीप सबनीस, आशुतोष नेर्लेकर, वर्षा जोगळेकर, सयाजी शेंडकर, निरंजन कुलकर्णी आणि नाट्यप्रयोगाच्या आयोजक अवंती बायस यांच्या या नाटकात भूमिका असून रुक्मिणीच्या प्रमुख भूमिकेत अस्मिता चिंचाळकर आहेत. संजय गोगटे, प्रमोद जांभेकर, विद्यानंद देशपांडे साथसंगत करणार आहेत.
नाट्यप्रयोगाच्या विनामूल्य प्रवेशिका शुक्रवार, दि. 12 रोजी सकाळी 9 वाजेपासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उपलब्ध असणार आहेत.
जाहिरात
जाहिरात