गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : सुमधूर जलतरंग, सुरेल व्हायोलिन अन् हार्मोनियम, तालाचे वैविध्य दर्शविणाऱ्या तबला, ड्रम्स, मृदंगम्, घटमची दमदार साथ, सूर-लयीची नजाकत दाखविणारे गायन यांच्या अनोख्या मिलाफाचे फ्युजन ऐकून रसिक स्तिमित झाले ते ‘डिव्हाईन कनेक्ट’ या मैफलीत!
‘डिव्हाइन कनेक्ट’ कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना तालयोगी पंडित सुरेश तळवलकर. समवेत प्रा. संजना निकम व प्रा. संजय निकम.
व्हर्सटाईल इंग्लिश मीडियम स्कूल अंतर्गत असलेल्या आर्टस् ॲण्ड स्पोर्टस् ॲकॅडमीतर्फे हिंदुस्थानी, कर्नाटक शास्त्रीय संगीत तसेच पाश्चात्य संगीताचा सुरेल व अनोखा मिलाफ असलेल्या ‘डिव्हाईन कनेक्ट’ या मैफलीचे आयोजन शकुंतला शेट्टी ऑडिटोरियम येथे करण्यात आले होते.
गायन, वादन आणि देश-परदेशातील वाद्यांची गुंफण करून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. प्रा. संजय निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनोख्या मैफलीला रसिकांची भरभरून दाद मिळाली.
प्रसिद्ध जलतरंग वादक पंडित मिलिंद तुळाणकर, युवा पिढीतील आघाडीच्या गायिका रुचिरा केदार, प्रसिद्ध हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णी, युवा तबला वादक गणेश तानवडे, मृदंगम्-घटम् वादक पंचम उपाध्याय, की बोर्ड व व्हायोलिन वादक अमन वरखेडकर व ड्रम्स वादक जय निकम यांचा कार्यक्रमात सहभाग होता.
कार्यक्रमाचा शुभारंभ तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. प्रा. संजना निकम व प्रा. संजय निकम यांनी पंडित तळवलकर यांचा सत्कार केला तर पंडित तळवलकर यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रुचिरा केदार यांनी ‘वातापी गणपती भजे हं’ या गणेशवंदनेने केली. युवा कलाकार अमन वरखेडकर याने व्हायोलिन वादनातून आपले कौशल्य दाखविले. त्याला गणेश तानवडे आणि पंचम उपाध्याय यांनी तबला व मृदंगम्ची समर्पक साथ केली.
पारंपरिक वाद्यांमधील भाव आणि पाश्चात्य वाद्यांमधील गती यांचा अनोखा मिलाफ जलतरंग, की-बोर्ड, तबला, हार्मोनियम, घटम्, मृदंगम् आणि ड्रम्स वादनातून प्रभावीपणे दर्शविण्यात आला.
ग्वाल्हेर-जयपूर घराण्याच्या गायिका रुचिरा केदार यांनी संवादिनीवादक मिलिंद कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेल्या संत मिराबाई यांच्या ‘पिया बिन सुनो छेजी म्हारो देस’ आणि ‘नैना लोभी रे’ या रचना सादर करून रसिकांना भक्ती आणि शृंगाररसाची अनुभूती दिली.
या गायनाला देखील पारंपरिक वाद्यांसह परदेशी वाद्यांची अप्रतिम साथ मिळाली.
मिलिंद कुलकर्णी यांची हार्मोनियमवर चपळाईने आणि सफाईदारपणे फिरणारी बोटे आणि त्यातून निर्माण झालेले उत्कट स्वर रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले.
जलतरंग या प्राचीन भारतीय वाद्याची परंपरा टिकवून नव्या पिढीपर्यंत हा वसा पोहोचविणारे पंडित मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंग वादनाला रसिकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली.
तुळाणकर यांना गणेश तानवडे यांनी तबल्याची साथ केली.
आदितालात ताल, लय आणि गणिताचा अनोखा मिलाफ दर्शविताना गणेश तानवडे (तबला), पंचम उपाध्याय (मृदंगम्) आणि जय निकम (ड्रम्स) यांनी सादर केलेले फ्युजन मैफलीचा कळसाध्याय ठरले. पाश्चात्य वाद्य असलेल्या ड्रम्स्मधून भारतीय तालाचे बोल ऐकवून जय निकम यांनी रसिकांना अचंबित केले. कार्यक्रमाची सांगता रुचिरा केदार यांनी पंडित दिनकरबुवा कैकाणी यांच्या ‘पनघट पे जल भरन कैसे जाऊँ’ या भैरवीतील पारंपरिक बंदिशीने केली. त्यांना हार्मोनियम, की-बोर्ड, व्हायोलिन, घटम्, मृदंगम्, मोरसिंग आणि ड्रम्स अशा सर्वच वाद्यांची साथ लाभली.
अभिनेत्री ऋतुजा फुलकर यांनी कलाकारांशी संवाद साधत कार्यक्रमाचे निवेदन केले.
‘एकोहं बहुस्यम्’ या उक्तीप्रमाणे गायन, वादन आणि नृत्य या कला एकच आहेत परंतु त्यांची प्रकट होण्याची माध्यमे वेगवेगळी आहेत असे सांगून तालयोगी पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, हिंदुस्थानी, कर्नाटक संगीताचा मिलाफ करून विचारांनी एकत्र येण्याचा हा अनोखा प्रयोग आहे. असा मिलाफ ऐकणे ही श्रोत्यांच्या आश्चर्याची परिक्षा असते. कलाकाराला विद्या कलेपर्यंत नेता आली पाहिजे, कारण विद्या ही बाहेरून आत येत तर कला ही आतून स्फुरते. याचे गणित साधता आले तर कलाकारालाही सादरीकरणातून आनंद घेता येतो आणि त्यातूनच श्रोत्यांनाही आनंद मिळतो.
————————————————-
जाहिरात –
जाहिरात
जाहिरात