गोल्डन आय न्युज नेटवर्क
पुणे : गीत-गझल-साज-आवाज यांच्या संगमाने पुणेकरांची सायंकाळ रंगली. निमित्त होते ते सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘सबरंग’ या अनोख्या मैफलीचे.
मैफलीचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते. रसिकांच्या मनाचा ठाव घेत एका पेक्षा एक सुमधुर गीते या मैफलीत सादर करण्यात आली.
मैफलीची सुरुवात प्रसिद्ध गायक-संगीतकार राजेश दातार यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या ‘महफील मे बहार है’ या गीताने झाली. पहिल्या गीतापासूनच पुणेकर रसिकांनी कार्यक्रमाला दिलखुलासपणे दाद देण्यास सुरुवात केली. ‘सलोनासा सजन है और मै हूँ’ या निवेदिता साहा यांनी सादर केलेल्या गीताने रसिकांना शब्द-सुरांची जादुई सफर घडविली. या नंतर राजेश दातार यांनी सादर केलेल्या ‘आयो कहाँ से घनश्याम’ या गीताला वन्स मोअर मिळाला तेव्हा सुरुवातीपासूनच वन्स मोअर घ्यायचा की वन मोअर गीत ऐकायचे अशी विचारणा सूत्रसंचालकांकडून झाल्यावर पुणेकर रसिकांनी वन्स मोअर आणि वन मोअर दोन्हीची आवर्जून मागणी केली.
संधीकालाची भावविभोरता अधोरेखीत करणाऱ्या ‘जब दीप जले आना’ या चित्रपट गीताने रसिकांना तरल प्रेमभावनांची अनुभूती दिली. पहिल्या गीतापासून रंगत जाणाऱ्या मैफलीत राजेश दातार आणि निवेदिता साहा यांनी सादर केलेल्या ‘दयारे दिल की रात मे चराग सा जला गया’ या गझलेने कातरवेळेची हुरहुर वाढीस लागली. या नंतर निवेदिता साहा यांनी सादर केलेल्या ‘दिल चिज क्या है आप मेरी जान लिजिए’ या उमरावजान चित्रपटातील गीताने रसिकांना सुरेल आठवणींच्या दुनियेत रमविले. ‘रंजीशी सही दिल ही दुखाने के लिए’, ‘होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चिज है’ आणि ‘वो कागज की कश्ती वो बारिश का पानी’ या गझलांनी रसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मैफलीची सांगता राजेश दातार यांनी सादर केलेल्या ‘पानीया ने चलने लागे’ या सुमधुर लोकसंगीतला उपस्थितांनी टाळ्यांचा ठेका धरत उत्स्फूर्त साथ दिली. गीतकार-संगीतकार आणि गायक-गायिकांनी अजरामर केलेल्या या शब्दवैभवात पुणेकर अबालवृद्ध इतके रंगून गेले की श्रोत्यांमधील बहुतेकांनी प्रत्येक गीत-गझलेतील शब्द गुणगुणत गायकांना साथ दिली. हे भावपूर्ण चित्र हेच सांगून गेले की, चाहते युगानुयगे या रचनांवर अपार प्रेम करत राहतील.
गीत, गझल, लोकसंगीत आणि चित्रपटगीतांच्या या अनोख्या मैफलीला कुमार करंदीकर (हार्मोनियम), अमित जोशी (तबला), राहुल श्रीवास्तव (गिटार) आणि रोहित कुलकर्णी (की-बोर्ड) यांनी समर्पक साथ केली. मैफलीत सादर झालेल्या बारा गीत-गझलांच्या विविधरंगी पुष्पांची सुंदर गुंफण दीप्ती पेठे यांनी आपल्या ओघवत्या निवेदनाद्वारे केली.
जाहिरात
जाहिरात