‘डिव्हाईन कनेक्ट’ मैफलीत रविवारी होणार देश-विदेशातील वाद्यांचे फ्युजन.
गायनासह जलतरंग, ड्रम्स, तबला, हार्मोनियम, मृदंगम्, घटम्, व्हायोलिन, कॅजॉन, की-बोर्डचा असणार समावेश
रविवारी मैफलीचे आयोजन : हिंदुस्थानी, कर्नाटक शास्त्रीय संगीतासह पाश्चात्य संगीताचा सुरेल व अनोखा मिलाफ
पुणे : हिंदुस्थानी, कर्नाटक शास्त्रीय संगीत तसेच पाश्चात्य संगीताचा सुरेल व अनोखा मिलाफ असलेल्या ‘डिव्हाईन कनेक्ट’ या मैफलीचे आयोजन रविवार, दि. 30 एप्रिल 2023 रोजी पुण्यात करण्यात येत आहे.
गायन, वादन आणि देश-परदेशातील वाद्यांची गुंफण करून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून या कार्यक्रमामध्ये प्रथितयश कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
व्हर्सटाईल इंग्लिश मीडियम स्कूल अंतर्गत असलेल्या आर्टस् ॲण्ड स्पोर्टस् ॲकॅडमीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्ध जलतरंग वादक पं. मिलिंद तुळाणकर, तबला वादक गणेश तानवडे, ड्रम्स वादक जय निकम आणि प्रा. संजय निकम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता कलमाडी हायस्कूलमधील शकुंतला शेट्टी ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
‘डिव्हाईन कनेक्ट’ या मैफलीत हिंदुस्थानी, कर्नाटक शास्त्रीय संगीतासह पाश्चात्य संगीतावर आधारित विविध रचना सादर होणार आहेत. अतिप्राचीन जलतरंग, पाश्चात्य संगीतातील लोकप्रिय ड्रम्स, प्राथमिक अवस्थेतील मोरचंग या वाद्यापासून बनलेला अतिशय प्रगत असा तबला, कर्नाटक संगीतातील प्रमुख तालवाद्य मृदंगम् व घटम् तसेच पाश्चिमात्य तालवाद्य कॅजॉन यासह मूळ पाश्चात्य परंतु आता भारतीय संगीतात रुजलेली हार्मोनियम व व्हायोलिन आणि पाश्चात्य संगीतातच प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या की-बोर्ड या वाद्यांना बेमालूमपणे एकमेकांमध्ये गुंफून अतिशय सुमधूर आणि आधुनिक संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न या अनोख्या फ्युजनमधून केला जाणार आहे.
प्रसिद्ध जलतरंग वादक पंडित मिलिंद तुळाणकर, युवा पिढीतील आघाडीच्या गायिका रुचिरा केदार, प्रसिद्ध हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णी, युवा तबला वादक गणेश तानवडे, मृदंगम् वादक पंचम उपाध्याय, की बोर्ड व व्हायोलिन वादक अमन वरखेडकर व ड्रमस् वादक जय निकम यांचा कार्यक्रमात सहभाग असणार आहे.
संगीत हे दैवी असल्यामुळे या कार्यक्रमाला ‘डिव्हाईन कनेक्ट’ असे समर्पक नाव देण्यात आले आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात
जाहिरात