गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : आग्रा घराण्याचे रातंजनकरबुवा, पंडित के. जी. गिंडे, इंदोर घराण्याचे पंडित अमरनाथ, उस्ताद आमीर खाँ, हिंदुस्थानी संगीत पद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती झुगारणारे पंडित कुमार गंधर्व, त्यांचे बालपणीचे सवंगडी डॉ. चंद्रशेखर रेळे, पंडित रामाश्रय झा, गो. ना. नातू अशा विविध रचनाकारांच्या सांगीतिक व्यक्तिमत्वाचे पैलू प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सत्यशील देशपांडे यांनी विविध रचनांद्वारे उलगडून दाखविले. पंडित देशपांडे यांनी स्वत: रचलेल्या काही रचनाही रसिकांना ऐकविल्या.
ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे ‘ख्याल विमर्श’ या चर्चा आणि सादरीकरण सत्राअंतर्गत ‘विविध रचानाकारांची सांगीतिक व्यक्तिमत्वे’ या विषयावर पंडित देशपांडे यांनी रसिकांशी सादरीकरणातून संवाद साधला.
या मालिकेतील अखेरचे सत्र गांधर्व महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.
उल्हास कुलकर्णी (तबला) आणि सृजन देशपांडे (सहगायन) यांनी साथसंगत केली.
या सत्रात पंडित देशपांडे यांनी गेल्या शंभर वर्षातील निवडक रचनाकारांबद्दल, त्यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्वाचे पैलू अधोरेखित करत त्यांच्या रचनांमधील सौंदर्यशास्त्र उलगडत आपल्या गायनाद्वारे त्यांची खुबीने गुंफण करून प्रभावी सादरीकरण केले.
प्रत्येक रचनाकाराचे सांगीतिक व्यक्तिमत्व, राग खुलविण्याचे त्याचे वैशिष्ट्य ठळकपणे कसे जाणवते या विषयी अभ्यासकांना या सत्रातून मोलाचे मार्गदर्शन घडले.
प्रत्येक रचनाकार जेव्हा एखाद्या रागाला आपलेसे करतो तेव्हा तो राग त्या रचनाकाराच्या सांगीतिक व्यक्तिमत्वानुसार वेगवेगळे रूप धारण करतो, त्याची गायन वैशिष्ट्ये त्या राग सादरीकरणात खुलवत नेतो असे सांगून ‘दुखवा होय गए साथी, जब कोई रोक ना पाती’, संधीप्रकाशकालातील भावविभोरता दर्शविणाऱ्या राग पुरिया धनाश्रीमधील ‘बल गई ज्योत’, ‘निलीमा लालीमा’, चारुकेशी रागातील ‘सुंदर सुरजनवा ठाडो’ अशा बंदिशी सादर केल्या.
काही रचनाकार-गायक हे स्वरांची गुंतागुंत सहजतेने उलगडत तर काही गायक उत्तम कवी असल्याने त्यांच्या रचनांमधून शब्दलाघव, भाषावैभव प्रकर्षाने जाणवते. तर काही पारंपरिक बंदिशींना प्रत्युत्तर म्हणून रचनाकाराला नवीन बंदिश रचण्याचे स्फुरण होते आणि त्यातूनच साध्यासोप्या शब्दात भावनापूर्ण-अर्थपूर्ण अशी रचना त्याला गवसते, असे सांगून पंडित देशपांडे म्हणाले, या सादरीकरणात गायकाची नक्कल नाही तर त्या पद्धतीचे सर्जन होते.
त्या त्या रचनाकाराच्या भूमिकेत जाऊन जगणे होते. त्याच्या भावाविश्वात जाऊन त्याची सांगीतिक भूमिका साकारणे मी गरजेचे मानतो. म्हणून राग जरी एकच असला तरी बंदिशीत बीजे कशी आहेत, दिशा काय दाखवितात त्यानुसार सादरीकरण करणे आवश्यक ठरते.
सुरुवातीस कलाकारांचे स्वागत ऋत्विक फाउंडेशनचे प्रमुख प्रवीण कडले आणि चेतना कडले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या समन्वयक रश्मी वाठारे यांनी केले.
जाहिरात –