गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : काश्मिरी सौंदर्यासह, नृत्य, वादन आणि हार्मनी गायनाने पुणेकर रसिकांना भुरळ घातली. निमित्त होते आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्र सरकार संस्कृती मंत्रालयातर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वितस्था (काश्मीर) महोत्सवाचे.
कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या आवारात आजपासून (दि. 31) या महोत्सवाला सुरुवात झाली. महोत्सव दि. 2 एप्रिल पर्यंत सुरू असणार आहे.
डोगरी, रोफ, बच्या नगमा, धमाली ही प्रमुख चार लोकनृत्ये सुरूवातीस सादर करण्यात आली. ‘रंगरूप वेशभाषा चाहें अनेक है’चे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हे सादरीकरण म्हणता येईल. ‘बच्या नगमा’ हा नृत्यप्रकार महाराष्ट्रातील गवळण या लोककला प्रकाराशी साधर्म्य साधणारा आहे. विशेषत: पुरुषांनी स्त्रीवेशात सादर केलेले हे नृत्य होय. ‘डोगरी’ नृत्य म्हणजे विवाह प्रसंगी होणारी नाचगाणी. काश्मिरच्या ‘वत्तल’ समुदायातील प्रचलित नृत्यप्रकार म्हणजे ‘धमाली’. ‘रोफ’ नृत्य म्हणजे ‘बुमरो बुमरो’चा फेर धरणे.
काश्मिरच्या या चार प्रमुख नृत्यप्रकारांचे दिग्दर्शन निलय सेनगुप्ता यांनी केले होते.
अब्दुल हमीद भट्ट यांच्या काश्मिरी रबाब वादनाने महोत्सवाची रंगत खुलवली. सुमारे 200 वर्षांचा पिढीजात वारसा जतन करणाऱ्या भट्ट यांना सहकलाकारांची दमदार साथ मिळाली.
त्यानंतर भांड पाथेर हा लोकनाट्य-नृत्य प्रकार सादर करण्यात आला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप अभय रुस्तम सोपोरी यांच्या संतूरवादनाने झाला.
उद्घाटन सोहळा –
महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, उद्योजक आशिम पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड, केंद्रीय सांस्कृतिक विभागाच्या सहसचिव उमा नांदुरी, काश्मिरी संकृतीचे अभ्यासक आणि वितस्था महोत्सवाचे नॉलेज पार्टनरसिद्धार्थ काक व्यासपीठावर होते. महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने झाले.
प्रास्ताविकात उमा नांदुरी म्हणाल्या, महाराष्ट्राला, पुणेकरांना काश्मिरी संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांनी काश्मिरी कला संस्कृतीचा अनुभव घ्यावा.
राहुल कराड म्हणाले, या उत्सवाच्या निमित्ताने सुंदर वातावरण तयार झाले आहे. काश्मीरची अनुभूती पुणेकरांना येत आहे, या उपक्रमात आम्हाला भाग घेता आला याबद्दल आयोजकांचे आभार मानतो.
डॉ. कारभारी काळे म्हणाले, काश्मीरच्या कला संस्कृतीची ओळख दाखवणारा वितस्था महोत्सव ऐतिहासिक अशा पुण्यात होत आहे याचा आनंद आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख युवा पिढीला होणार आहे.
सिद्धार्थ काक म्हणाले, काश्मीरच्या कला-संस्कृतीचे वैविध्य सर्व काश्मिरीही जाणत नाहीत. हे सांस्कृतिक वैविध्य जगासमोर आणण्यासाठी या महोत्सव आयोजन करण्यात आले आहे.
मान्यवरांचा सन्मान उमा नांदुरी यांनी केला.
डॉ दीपक खिरवडर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्नल राजेंद्र जिंदल यांनी केले.
————————————————-
जाहिरात – Click on Image
जाहिरात – Click on Image
जाहिरात – Click on Image