स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्काराइतकाच मोलाचा – अनुप जलोटा
स्व. राम कदम कलागौरव पुरस्काराने अनुप जलोटा, जावेद अली यांचा गौरव
जावेद अली यांनी गायलेल्या ‘शूर आम्ही सरदार..’ गीताने चेतविली विरश्री
‘श्रीवल्ली’ गाण्यावर पुणेकरांनी धरला ताल
पुणे : ख्यातकीर्त संगीतकार राम कदम यांच्या नावाने मिळालेला कलागौरव पुरस्कार संगीत नाटक अकादमी इतकाच मोलाचा वाटतो, अशा शब्दात भजनसम्राट अनुप जलोटा यांनी आपल्या भावना व्यक्त करीत भजन हा असा काव्य प्रकार आहे ज्यात अध्यात्म आणि ज्ञानाची अनुभूती येते. ‘राम नाम मिठा है कोई गाके देखले’ या भजनाद्वारे रसिकांची इच्छा पूर्ण केली तसेच प्रसिद्ध युवा गायक जावेद अली यांनी स्फूर्ती रसात ‘शूर आम्ही सरदार’ या मराठी गीताने प्रेक्षकांमध्ये विरश्री चेतविली तर ‘श्रीवल्ली’ या गीताद्वारे ताल धरायला उद्युक्त केले. कुठलाही पुरस्कार कलाकाराला पुढील वाटचालीसाठी ताकद, उर्जा देणारा ठरतो, अशी भावना जावेद अली यांनी व्यक्त केली.
निमित्त होते शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे.
सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष पद्मभूषण प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा व युवा गायक जावेद अली यांना स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, धारिवाल इंडस्ट्रिजचे एम. डी. प्रकाश धारिवाल, सुहाना-प्रविण मसालेवाले उद्योगाचे एम. डी. विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राकेश सांकला यांच्यासह प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड व्यासपीठावर होते. प्रत्येकी एक लाख रुपये, शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि स्व. राम कदम परिधान करीत अशी फरची टोपी असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे 14वे वर्ष आहे.
मी माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोलू शकतो – डॉ. शां. ब. मुजुमदार
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, पूर्वी भजन म्हणणे म्हणजे हे वृद्धांचे काम असे म्हटले जायचे पण अनुप जलोटा यांनी भजनाचे सार्वत्रिकीकरण, लोकशाहीकरण केले.
गुरूप्रती आदर कसा असावा याचे उदाहरण म्हणजे जावेद अली असल्याचे ते म्हणाले. प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करताना डॉ. मुजुमदार म्हणाले, 50 वर्षात जेवढे कार्य करणे शक्य नाही तेवढे कार्य लक्ष्मीकांत खाबिया यांनी 25 वर्षांत केले आहे. खाबिया यांच्या कार्याचा गौरव करीत असताना प्रेक्षकांमधून, खाबिया यांना सांस्कृतिक मंत्रीपद मिळाले पाहिजे, यासाठी तुम्ही शरद पवार यांच्याशी बोला अशी मागणी झाली तेव्हा, मी शरद पवारच काय तर माननिय नरेंद्र मोदी यांच्याशीही याविषयी बोलू शकतो, असे मुजुमदार यांनी सांगताच प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
संस्थेच्या 25 वर्षांच्या वाटचालीचे छायाचित्रांच्या माध्यमातून केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार विरेंद्र लाटकर (नागपूर) आणि राकेश खराडे (पनवेल) यांना या प्रसंगी प्रदान करण्यात आला.
शरद पवार यांची कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करणारी चित्रफित या वेळी दाखविण्यात आली. प्रतिष्ठानच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, प्रसिद्ध गायक शंकर महादेव आणि प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी पुरस्कार प्राप्त अनुप जलोटा आणि जावेद अली यांना चित्रफितीद्वारे शुभेच्छा दिल्या.
शारदा गोविंद-शरद प्रतिभा पुरस्कारांची घोषणा
सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलेला शारदा गोविंद तर ध्येयवादी व्यक्तीला शरद-प्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा लक्ष्मीकांत खाबिया यांनी या वेळी केली.
गृहमंत्र्याविषयी नाराजी
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे गृह विभागाच्या सहकार्याने राज्यातील बंदिजनांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या निमित्ताने बंदिजनांच्या कलागुणांना वाव मिळावा. अंतिम फेरीसाठी सहा संघांची निवड करण्यात आली आहे. अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभास गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळत नसल्याबद्दल गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी लक्ष्मीकांत खाबिया यांनी नाराजी व्यक्त केली. संस्थेच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा आढावाही त्यांनी सादर केला.
मान्यवरांचे स्वागत विनोद भोईटे, सुशील बोरडे, अश्विनी पाचारणे, राजेंद्र पाचारणे, रोशन खोब्रागडे, राजाभाऊ इसाने, निखिल शिंदे, राजन जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, किरण सानप, शागीरा शेख, शिवानी आबनावे, प्रशांत शिंदे, ह.भ.प. डॉ. हरीदास आखरे, प्रज्ञा तोरसेकर, संगीता ठाकरे यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त राम कदम यांनी संगीत दिलेली गीते नंदेश उमप, संदीप उबाळे, श्रद्धा जोशी, सावनी सावकर, एवंत सुराणा सादर यांनी सादर केली तर अमृता केदार, मुकेश देढीया, अजय अत्रे, राजेंद्र दूरकर, मिहिर भडकमकर, पद्माकर गुजर, राजेंद्र साळुंखे यांनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांचे निवेदन तर सचिन इंगळे यांने संगीत संयोजन होते. नंदेश उमप यांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
————————————————-
जाहिरात – Click on Image for more details
जाहिरात Click on Image for more details