तीन वर्ग प्रेमाचे !
सकाळचा अलार्म जोरात वाजत होता, कसाबसा पांघरूना मधून हात बाहेर काढून त्याचा आवाज बंद करून परत एखादी डुलकी घ्यावी म्हणून कूस बदलून परत मी झोपी गेलो. पण अचानक आमचा दुसरा अलार्म किचन मधून मला आवाज दिला, “अहो उठा साडेआठ वाजले आहेत. ऑफिस ला जायला उशीर होईल, ट्राफिक वाढेल…. उठलात का ?”. या अलार्म ला मी बंद करू शकलो नाही आणि इच्छा होत नसताना देखील कसाबसा “अगं काय सकाळी सकाळी ओरडत आहेस?” अशी बडबड करत उठलो आणि डोळे चोळत सहज घड्याळाकडे पहिले तर आठ वाजले होते.
मी तिच्याकडे पाहत बोललो, “अगं काय खोटे बोलतेस !, आता कुठे आठ वाजले. कशाला उठवलेस उगीच ?” पण नाईलाजाने मला उठावे लागले. अंथरून पांघरून घडी करत मी तिला विचारले, “आज ऑफिस मधून यायला कदाचित उशीर होईल, पण जर लवकर आलोच तर आज आपण पिक्चर बघायला जाऊया ?.” ती माझे वाक्य पूर्ण होण्या अगोदरच बोलून गेली. “हे तुम्ही दरवेळी म्हणता.” मी म्हंटले “नाही, या वेळी नक्की जायचे आहे, मी ऑफिस चे काम लवकर आटोपून यायचा प्रयत्न करतो. फक्त काही अचानक काम निघू नये म्हणजे देव पावला.” असे बोलून मी प्रातःविधीसाठी निघून गेलो.
जवळपास एक तासानंतर माझे सर्व आटोपून झाले आणि बायकोचे पण सर्व आवरुन झाले होते. थोडासा चहा घेऊन, डबा बॅगेत भरून मी बायकोचा निरोप घेतला आणि ऑफिस कडे निघालो. बायकोने म्हंटल्याप्रमाणे रस्त्यावर गर्दी वाढली होतीच. माझे लक्ष सारखे सारखे माझ्या घड्याळाकडे जात होते. कारण आज मला लवकरात लवकर सर्व कामे आटोपून बायकोला बाहेर घेऊन जायचे होते. त्यामुळे जेवढ्या लवकर मला ऑफिस ला जाता येईल तेवढ्या लवकर जाण्यासाठी मी उतावीळ होतो.
कदाचित अनेक दिवसा मधून पहिल्यांदा मी ऑफिस ला लवकर जाण्यास इच्छुक होतो. कारण सहसा कोणताही कर्मचारी ऑफिस ला जाताना जेवढा उतावीळ नसतो तेवढा तो ऑफिस मधून बाहेर पडण्यासाठी असतो. एका सिग्नल वर माझी गाडी थांबली असता माझे लक्ष बाजूच्या फूटपाथ वर संसार थाटलेल्या एका जोडप्याकडे गेले त्यात तो पुरुष आपल्या बायकोची वेणी बांधत होता आणि पिंपळाच्या एका पानाला तिच्या डोक्यात माळत होता. दोघांच्याही अंगावर मस्त कोवळे ऊन पडले होते. कदाचित दोघात काहीतरी चर्चा चालू असावी कारण दोघेही हसत होते. क्षणभर विचार आला, ‘यांना राहायला घर नाही, खायला दोन वेळचे जेवण मिळेल का नाही याची शाश्वती नाही, अंगभर कपडे देखील नाहीत, परंतु यांना प्रत्येक क्षण जगताना आनंद घ्यावासा वाटतो हे खरेच शिकण्यासारखे आहे.
अचानक हॉर्न वाजू लागले आणि सिग्नल सुटल्यामुळे मला पुढे जावे लागले परंतु काही क्षण मी माझ्या गाडीच्या आरश्यामधून त्यांना परत एकदा पहिले त्यावेळी तो नवरा तिच्या डोक्यावर एक टपली मारून हसत हसत उठला. माझ्या साठी त्या दोघांचा हसरा चेहरा काहीतरी सांगत आहे असे जाणवत होते. परंतु मला ऑफिसला पोहचण्याचे वेध लागल्याने माझे विचार क्षणात लोप पावले. असो कसाबसा वेळ काढत आणि गर्दीतून वाट काढून मी माझ्या ऑफिसमध्ये पोहचलो. ऑफिस मध्ये पोहचताच, जसे भुकेजलेले प्राणी आपल्या शिकार वर तुटून पडतात तसा मी माझ्या कामावर तुटून पडण्यास तयार होतो कारण, अनेक दिवसापासून मला बायकोसोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लांनिंग निष्फळ ठरत होते.
परंतु आज मी सकाळी बायकोला दरवेळी सारखे promise केले खरे परंतु, येताना सिग्नल वर जोडप्याला पाहिल्याने मला विशेष प्रेम तयार झाले आणि आज कोणत्याही परिस्थितीत तिला बाहेर फिरायला घेऊन जायचेच आणि movie दाखवायचीच असा निर्धारच जणू माझ्या मनानी केला आणि सर्व अवयवांना जलद कामे करण्याचे जणू आदेशच देऊन टाकले होते. कामाचा काही कालावधी संपला होता, Lunch Time झाला, मी (आणि कदाचित इतरांनी देखील) बायकोनी बनवलेला डबा आवडीने संपवला आणि परत सर्वजण कामाला सुरवात केली.
थोडा वेळ होताच officeboy मार्फत HR तर्फे एक निरोप आला. “सर्वाना सरांनी conference मध्ये एकत्रित जमायला सांगितलेले आहे.” Conference हा शब्द ऐकताच एका क्षणात माझ्या मनात काहूर माजले, काय निरोप असेल?, सर्वाना एकत्रित का बोलावले असेल? काही अचानक काम वाढवले तर नाही ना ? आज उशीरा पर्यंत थांबण्यास तर सांगितले जाणार नाही ना?, आपले काही काम pending तर नाही ना ? असे विविध प्रश्न माझ्या मनात गर्दी करू लागले आणि परत एकदा बायकोला लावलेली आशा हि आशा च राहून जाईल का अशी धाकधूक लागून राहिली होती.
सर्वजण conference मध्ये एकत्र जमा झालो, अनेकांची आपापसात चर्चा चालू होती पण माझे मन एकाग्र होण्याचे प्रयत्न करत होते. काही वेळेत सर (Managing Director) यांनी conference मध्ये प्रवेश केला. सर्वानी त्यांना उभे राहून आदर दिला, सरांनी सर्वाना ” बसा बसा” असे सांगितले परंतु या सांगण्यात एक आनंद जाणवला आणि एक क्षण माझ्या मनातील प्रश्नांची थोडी गर्दी कमी झाल्याचे मला जाणवले आणि मी एक दीर्घ श्वास भरला. सर्वांच्या नजरा सरांच्या बोलण्याकडे होत्या, सर्वाना एकत्र का बोलावले आहे हे सांगण्यासाठी सरांनी बोलण्यास सुरुवात केली. “आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे, त्यांमुळे आज आपले ऑफिस २ तास लवकर बंद केले जाईल आणि आपल्या सर्वाना लवकर घरी जाण्यास दिले जाईल.”
सरांचे बोलणे चालूच होते परंतु एवढे ऐकून मी क्षणभर डोळे बंद करून जगातील सर्व देवतांचे जणू आभारच मानत होतो. आम्ही सर्वांनी आमच्याकडून मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सरांनी त्या स्वीकार पण केल्या. त्यावर सरांनी अजून एक निरोप दिला की, “तिच्या (मॅडम च्या) वाढदिवसानिमित्त (एका पंचतारांकित हॉटेल चे नाव घेतले आणि म्हणाले) हॉटेल एका दिवसासाठी बुक करायचा आहे, सर्व पाहुण्या मंडळीं आणि मित्र मंडळींच्या स्वागताची तयारी पण करायची आहे, त्यामुळे सर्वाना लवकर सुट्टी (असे म्हणून ते हसले).
कारण पहिल्यांदाच आमच्याकडे तिचा वाढदिवस साजरा होत आहे (पहिल्यांदाच आहे कारण, सरांचे लग्न नुकतेच ८-९ महिन्यापूर्वी झाले होते म्हणून ते असे म्हणाले होते) त्यामुळे घरगुती सेलेब्रेशन करायचे आहे…. असो enjoy करा”… असे म्हणून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. पण काही असो मी मनातल्या मनात मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या होत्या कारण, मला आज वेळेत घरी जायचे होतेच आणि त्याच वेळी त्यांच्या मुळे ही बातमी येणे म्हणजे माझ्यासाठी ‘सोने पे सुहागा’ असेच झाले होते. मी काम आटोपून सर्वांबरोबर एकत्र ऑफिस बाहेर पडलो. मी गाडीवरून जाताना मस्त मुड मध्ये गुणगुणत होतो. मला माहित नाही का?, परंतु मी माझ्या लग्नानंतर २-३ वेळेस एकत्र बाहेर गेलो होतो खरा पण, यावेळेस का कोणास ठाऊक मला वेगळा आनंद येत होता जसे आम्ही पहिल्यांदाच बाहेर जात आहोत.
घरी जाताना मस्त एक मोगऱ्याचा गजरा सोबत घेतला आणि कोठेही न थांबता थेट घर गाठलं.घरी पोहचताच दारावरची बेल वाजवली, बायकोनी दार उघडले
आणि क्षणभर मला लवकर आलेले पाहून ती आश्यर्य चकित झाली, तिच्या काही बोलण्या अगोदरच मी “surprise” असे म्हणत घरात प्रवेश केला. ती काही सेकंद माझ्याकडे पाहत मला विचारली, ” अरे वा !, आज स्वारी खरंच फिरायला घेऊन जायला आली ?” मी पायातील शूज आणि मोजे काढत म्हंटल “हो, एकदा मी ठरवलं ते ठरवलं. येणार म्हंटल होतं, मी आलो. मग आता पुढे काय ठरवले आहे? कोठे जायचे ?” ती म्हणाली, ” मी काही नाही ठरवले. मला वाटलं आज देखील तुम्हाला उशीर होईल.” मी म्हटलं, उशीर कसा होणार? आणि मला कोण अडवतय? मी काहीही करून येणार च होतो…. बरं ते जाऊ दे हे बघ काय आणलंय मी !” असं म्हणत मी बागेतून गजरा काढून तिच्या समोर धरला.
गजरा पाहून तिच्या चेहऱ्यावर एक निराळा हसू मला दिसला आणि ती थोडी लाजतच म्हंटली, “तुम्ही तर आज नवीन लग्न झालेल्या जोडप्या सारखं करत आहात.” मी म्हंटल, “नवीन ?… मग आपण काय जुने झालो आहोत काय ? लग्नाला २ वर्षे झाली म्हणजे जुने नाही होत… आणि खरं तर जोडपं कधीच जुनं होत नसत… जुने होतात ते त्यांच्या आठवणी… जोडपं आणि त्यांचं प्रेम वर्षानुवर्षे नवीनच राहतात.” असे बोलताच ती म्हणाली, “ओ मजनू साहेब आपण आता कुठे जायचे ते सांगा !.” मी म्हंटल “तू फ्रेश हो, मी पण फ्रेश होतो. मस्त गार्डन मध्ये थोडा वेळ जाऊ, तिथून थिएटर ला जाऊ, movie पाहू, रात्री बाहेरच जेवण करू, थोड्या गप्पा मारू आणि परत आपल्या या महालात परत येऊ…. कसा वाटलं प्लॅन ?”… ती मोगऱ्याच्या गजऱ्याचा वास घेऊन फ्रिज मध्ये ठेवत म्हणाली “काही हरकत नाही जाऊया “.. (खरे तर ती कधीच माझे निर्णय नाकारत नाही म्हणून माझा कोणताही प्लॅन असता तरी सहज ती मला सहमत होते).
मग आम्ही फ्रेश होऊन बागेत फिरून, movie पाहून बाहेर एका छोट्याश्या परंतु चांगल्या फॅमिली रेस्टोरंट मध्ये जेवण केलं, तिला त्यावेळी ice cream खावासा वाटला म्हणून आम्ही थोड्या जवळच असलेल्या Ice Cream शॉप वर जाऊन ice cream खाल्ला आणि जवळपास ११ च्या दम्यान घरी परतलो. पुन्हा फ्रेश होऊन आम्ही आराम करायला बेडवर पडलो. काही वेळ त्या काही तासात घडलेल्या घटनांवर आणि movie मधील काही scenes वर गपशप केली आणि शांत पणे मी वरती फॅन कडे पाहत आजच्या दिवसभराची highlight च जणू मी डोळ्यासमोर पाहत होतो. यात मला एक गोष्ट जाणवत होती की, आज मी तीन वेगवेगळ्या जोडप्याना अनुभवलं होतं. खरंच या समाजात तीन प्रमुख गट किंवा वर्ग राहतात एक म्हणजे गरीब जो आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी फक्त प्रेमाने तिचे केस विंचरून देत होता आणि मजेदार किस्से सांगून तिला खुश करत होता. दुसरा म्हणजे माझे बॉस, जे आपल्या पत्नीला तिच्या वाढदिवसानिमित्त खुश ठेवण्यासाठी एक आलिशान महागड्या हॉटेल मध्ये सर्व मित्र मंडळींसोबत पार्टी आयोजित केली होती आणि तिसरा म्हणजे मी, जो आपल्या पत्नीला खुश ठेवण्यासाठी तिला एक गजरा देतो, बागेत फिरवून आणतो, movie दाखवतो आणि बाहेर मध्यम हॉटेल मध्ये जेवण करतो.
परंतु या सर्व जोडप्याने आपापल्या परीने आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने शक्य असलेल्या गोष्टी करून आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांच्या पत्नी देखील त्यातच आपले आनंद शोधून त्यांचा प्रयत्नांना कौतुकाची थाप देत होते. खरंच मला पहिल्यांदा अश्या काही घटनांची एकत्र तुलना करावी वाटली आणि ती कदाचित च कोणी यापूर्वी केली असेल कारण, या समाजात तीन विभिन्न गटाचे लोक राहत जरी असले तरी त्यांच्या साठी आपल्या जोडीदाराचे सुख हा एकमेव उद्देश कॉमन असतो आणि ते त्यांच्या परीने शोधण्यास प्रयत्न करतात आणि अनेकजण यशस्वी देखील होतात. कारण ज्या जोडीदारासोबत आपले संपूर्ण आयुष्य आपण जगणार असतो त्यांना आनंदी ठेवण्याचे आणि त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचे आपण वाचन दिलेले असते आणि त्याला आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो यातच खरे प्रेम दडलेले आहे. या सर्व घटनांना पाहून एकच म्हणावेसे वाटते की, या समाजात प्रेम व्यक्त करण्याचे प्रकार अनेक असू शकतात परंतु मुख्यत्वे प्रेमाचे तीनच वर्ग आहेत, जे मी आज पहिले आहे.
लेखक :- अमरजीत विलासराव कुलकर्णी (मुरूमकर)
पत्ता :- सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६.
मोबाईल नंबर :- ९८३४०१३६६३.
जाहिरात –