गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणेकरांनी अनुभवला अष्टपदी भजनांचा अनोखा प्रकार !!
वै. दादा सबनीस जन्मशताब्दी सांगतेनिमित्त विशेष कार्यक्रम !
पुणे : कवी जयदेव यांच्या अष्टपदीमधील पदांवर वारकरी सांप्रदायाप्रमाणे पंचपदी व अभंगांसह केलेला अभिनव विस्तार म्हणजे सांप्रदायिक अष्टपदी. अष्टपदी भजनांचा हा अनोखा प्रकार पुणेकरांनी अनुभवला.
निमित्त होते भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर संस्थान येथे आयोजित ‘अष्टपदी भजन’ या विशेष कार्यक्रमाचे. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाह चित्राताई जोशी, कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. सुरुवातीस मिलिंद सबनीस यांनी भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांच्या कार्याची माहिती विशद केली.
अष्टपदी भजन’ सादर करताना भिवंडी येथील संत शांतारामभाऊ जयवंत यांच्या नाथमंदिरातील भानुदास महाराज आमरे
ह. भ. प. भानुदास महाराज आमरे आणि भिवंडी येथील संत शांतारामभाऊ जयवंत यांच्या नाथमंदिरातील साधकवर्गाने अष्टपदी भजन सादर केले. अष्टपदी हा भजन प्रकार कवी जयदेव यांनी 12व्या शतकात गीत गोविंदातील संस्कृत भजनात रचला आहे. ज्यात श्रीकृष्णाचे विलोभनीय रूप आणि गोपिकांमधील स्नेहाचे वर्णन केले आहे. अष्टपदीच्या रचनांमध्ये अध्यात्मातील गुढार्थ लपलेला असतो. हा अनोखा प्रकार आज पुणेकरांना अनुभवायला मिळाला.
अष्टपदीची सुरुवात ‘श्री नारायण जय नारायण, सद्गुरू नारायण नारायण’ या पारंपरिक गजराने झाली. त्यानंतर ‘तुज पाहता सामोरी’, ‘योगीया दुर्लभ तो या देखिला साजणी’ आदी रचना सादर करण्यात आल्या. जयदेवांच्या अष्टपदीमधील ‘माधव जय जय’ पदाचा विस्तार करीत सांगता मध्वमुनश्वर यांच्या ‘माघारी जरा थांब’ या गौळणीने करण्यात आली. उभ्याने केलेल्या भजनास पखवाज, संवादिनी आणि टाळांची साथ तसेच गौरांग प्रभुंच्या नृत्यपरंपरेची जोड हेही अष्टपदी भजनाचे वैशिष्ट्य अनुभवायला मिळाले.
ह. भ. प. भानुदास महाराज आमरे यांचा सत्कार चित्राताई जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
__________________________________,___,____
जाहिरात