गोल्डन आय न्युज नेटवर्क
दादा सबनीस जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त
‘भूपाळी ते भैरवी’ आणि ‘अष्टपदी भजन’ कार्यक्रमाचे आयोजन !!
पुणे : वै. दादा सबनीस जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त शनिवार, दि. 19 आणि रविवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मिलिंद सबनीस यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
शनिवार, दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता सदाशिव पेठेतील म. ए. सोसायटीचे भावे प्राथमिक शाळा सभागृह (रेणुका स्वरूप प्रशाला आवार) येथे ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसेविका समिती नागपूर संचलित राणी लक्ष्मीबाई भजन मंडळाची निर्मिती असलेले भजन, जोगवा, गोंधळ, भारूड अशा भक्तीसंगीताच्या प्रकारांचे अभिनव सादरीकरण होणार आहे. नागपूरमधील वंदनीय मावशी केळकर यांच्या विनंतीवरून वै. दादा सबनीस दरवर्षी भजन वर्ग घेत असत.
या वर्गातील पुढील पिढी या कार्यक्रमातून वै. दादा सबनीस यांना आदरांजली अर्पण करणार आहे. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाह चित्राताई जोशी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व आळंदी संस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त विद्यावाचस्पती ह. भ. प. अजित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रविवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर संस्थान येथे ‘अष्टपदी भजन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भिवंडी येथील संत शांतारामभाऊ जयवंत यांच्या नाथमंदिरातील साधकवर्ग कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे संचलन ह. भ. प. भानुदास महाराज आमरे करणार आहेत. कवी जयदेव यांच्या अष्टपदीमधील एक पद निवडून वारकरी पद्धतीने पंचपदी व अभंगांसह केलेला अभिवन विस्तार म्हणजे सांप्रदायिक अष्टपदी उभे भजन होय. हा अनोखा प्रकार या निमित्ताने अनुभवता येणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
__________________________________________
जाहिरात