गोल्डन आय न्यूज नेटवर्क
वेतनासंदर्भातील निकाल पथदर्शी ठरेल : पुष्कराज पाठक !!
कला महाविद्यालयातील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्यावतीने गौरव
पुणे : माणुसकी हा संस्थेचा पाया आहे. दिवंगत सचिव भालचंद्र पाठक यांनी घालून दिलेल्या आदर्शावर संस्था कार्यरत आहे. संस्थेला यशोशिखरावर नेण्यासाठी सकारात्मक मानसिकता,प्रामाणिक प्रयत्न आणी संयम अपेक्षित असतात, असे प्रतिपादन भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक यांनी केले.
कला महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील निकाल पथदर्शी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील अनुदानीत कला महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनासंदर्भात केलेल्या प्रयत्नामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान टळले आहे.
या निमित्त राज्यातील कला महाविद्यालयांच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राचार्य संघटनेच्या वतीने सचिव पुष्कराज पाठक यांचा आज (दि. 16) सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन पाठक यांचा सत्कार करण्यात आला.
स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनव कला महाविद्यालयाचे (टिळक रोड) प्राचार्य विलास चोरमले, अभिनव कला महाविद्यालयाचे (पाषाण) प्राचार्य डॉ. संजय भारती, माजी प्राचार्य राहुल बळवंत, विभाग प्रमुख राहुल बोरावके, प्रा. जितेंद्र गाडेकर, प्रा. सतिश काळे मंचावर होते.
कला महाविद्यालयातील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात (डावीकडून) प्राचार्य राहुल बळवंत, संजय भारती, विलास चोरमले, पुष्कराज पाठक, राहुल बोरावके, सतीश काळे, जितेंद्र गाडेकर.
पुष्कराज पाठक पुढे म्हणाले, शैक्षणिक संस्थांना उत्पन्नाचे साधन नसते. संस्थेला शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 90 टक्के अनुदान मिळत असले तरी संस्था 10 टक्के विना अनुदान तत्त्वावर कार्यरत होती. याच नैसर्गिक न्यायतत्त्वावर न्यायालयात दाद मागण्यात आली.
संस्थेची ही भूमिका ग्राह्य धरण्यात आली. या निर्णयाचा फायदा केवळ अभिनव कला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर राज्यातील कला महाविद्यालयातील शिक्षक-कर्मचाऱ्यांना झाला आहे.
डॉ. संजय भारती म्हणाले, शिक्षक-कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटावा यासाठी अनेक वर्षे प्रयत्न होत होते परंतु यश येत नव्हते. पुष्कराज पाठक यांनी योग्य पद्धतीने न्यायालयीन लढा दिल्यामुळे प्रश्न सुटला आहे.
विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने संस्थेने प्राधान्य दिले असल्याचे विलास चोरमले म्हणाले. प्रा. राहुल बळवंत, प्रा. अरविंद कोळप, प्रा. समीर आगळे, प्रा. प्रज्ञा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचानल अनंत डेरे यांनी केले तर आभार आत्माराम पुंड यांनी मानले.