गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठातर्फे शनिवार, रविवारी मुक्तसंगीत चर्चासत्र!!
डॉ. प्रमोद गायकवाड, नृत्यगुरू स्वाती दैठणकर यांचे सप्रात्यक्षिक व्याख्यान !
पुणे : गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 12 आणि रविवार, दि. 13 जुलै रोजी स-प्रात्यक्षिक मुक्तसंगीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम दोनही दिवस सायंकाळी 5:30 वाजता एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे.शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने गानवर्धन संस्था 1982 पासून मुक्त संगीत चर्चासत्राचे आयोजन करीत आहे. शास्त्रीय संगीतामधील गायन, वादन व नृत्य या विषयांमधील शास्त्र, सौंदर्यस्थळे व सादरीकरण याविषयी मान्यवर गुरू व तज्ज्ञ कलाकार प्रात्यक्षिकासह व्याख्यान देतात.
डॉ. प्रमोद गायकवाड
शनिवारी (दि. 12) ‘शहनाई’ या विषयावर डॉ. प्रमोद गायकवाड हे स-प्रात्यक्षिक व्याख्यान देणार आहेत. सुप्रसिद्ध निवेदिका शिल्पा देशपांडे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. निलेश रणदिवे यांची तबला साथ असेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गायक, लेखक व निर्माते आनंद माडगुळकर असणार आहेत.
रविवारी (दि. 13) सुप्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यगुरू स्वाती दैठणकर या ‘नृत्ययोग.. अद्वैताचा प्रवास’ या विषयावर शिष्यांसह स-प्रत्याक्षिक व्याख्यान देणार आहेत. पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार हे कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत.
नृत्यगुरू स्वाती दैठणकर
याच कार्यक्रमात नृत्य पंडिता विदुषी कै. सुजाता नातू पुरस्कृत युवा कथक कलाकार पुरस्कार वैष्णवी देशपांडे व उत्कृष्ट संगतकार पुरस्कार तालवादक निलेश रणदिवे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच डॉ. आसावरी रहाळकर व रमा कुकनुर यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.