गोल्डन आय न्यूज नेटवर्क
उलगडला मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर यांचा सांगीतिक जीवनपट.!!
शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंग, चित्रपट आणि भावसंगीतावर आधारित रचनांचे प्रभावी सादरीकरण !!
पुणे : शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंग, चित्रपट संगीत आणि भाव संगीतावर आधारित गायन तसेच संवादात्मक कार्यक्रमातून संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर यांचा सांगीतिक जीवनप्रवास उलगडला.
यंदाचे वर्ष कृष्णाजी गणेश फुलंब्रिकर ऊर्फ मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर यांचे शतकोत्तर रौप्यजयंती वर्ष आहे. या निमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आज (दि. 14) भरत नाट्य मंदिरात पंडित मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर सांगीतिक जीवनप्रवास या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची होती. तर या कार्यक्रमास मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग श्री. विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले.
भरत नाट्य मंदिर येथे आयोजित पंडित मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर सांगीतिक जीवनप्रवास कार्यक्रमात सादरीकरण करताना पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर. समवेत प्रशांत पांडव (तबला), कस्तुरी जोशी, अद्वैत केसकर (तानपुरा, सहगायन) आणि प्रवीण कासलीकर (संवादिनी).
मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर यांची नात प्रिया फुलंब्रिकर यांची विशेष उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधीक्षक जान्हवी जानकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची निर्मिती भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांची होती.
पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, हृषिकेश बडवे, अनुराधा मराठे, शिल्पा दातार, आदिती बोरकर यांचे गायन झाले. प्रवीण कासलीकर (संवादिनी), पांडुरंग मुखडे, प्रशांत पांडव (तबला), हिमांशू जोशी (ऑर्गन), संतोष मोरे (तालवाद्य), मुकुंद कोंडेकर (पखवाज), अद्वैत केसकर, कस्तुरी जोशी (तानपुरा, सहगायन) यांची साथसंगत होती.
प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी यांनी मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर यांच्या अनेक आठवणी जागवत किस्से सांगितले तर प्रिया फुलंब्रिकर यांनी मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
भरत नाट्य मंदिर येथे आयोजित पंडित मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर सांगीतिक जीवनप्रवास कार्यक्रमात सहभागी प्रशांत पांडव, पांडुरंग मुखडे, आदिती बोरकर, शिल्पा दातार-पुणतांबेकर, ऋषिकेश बडवे, अनुराधा मराठे.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी मैफलीची सुरुवात राग मारवामधील ‘आज मदमाती होरी खेलन को बरजोरी’ या बंदिशीने केली. याला जोडून द्रुतमधील ‘पिया बिन जियरा’ ही रचना सादर केली. रागांची नवनिर्मिती करणे ही मास्तरांची खासियत होती त्यातूनच त्यांनी शिवरंजनी व यमन रागांचे मिश्रण करीत शिवकल्याण राग रचला.
या रागातील ‘माई री तम करो दुल्हन पे’ ही बंदिश सादर केली. मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर यांनी रचलेल्या चार सुरांमधील रागाची झलक दाखवून पंडित कशाळकर यांनी ‘आला विराट ज्ञानी राजा’ हे नाट्यगीत सादर केले. मैफलीची सांगता ‘रंग रंग मुख पे मत फेको बनवारी’ या अडाणा रागातील बंदिशीने केली. पंडित कशाळकर यांच्या दमदार गायन आणि बहारदार सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
मला मास्तरांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला नाही, परंतु त्यांच्या हस्ते एका स्पर्धेत पारितोषिक मिळाले ही आठवण सांगून पंडित कशाळकर म्हणाले, मी मास्तरांचे शिष्य रामभाऊ मराठे यांच्याकडे गायन शिकत असताना मास्तरांविषयी अनेक गोष्टी समजल्या तसेच त्यांची अनेक ध्वनीमुद्रणे ऐकण्याची संधी मिळाली.मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर यांना नवनिर्मितीचा ध्यास होता. त्यांच्या काळी पारंपरिक बंदिशींवर नाट्यगीते रचली जात असत; परंतु मास्तरांनी मात्र नाट्यगीतावरून बंदिश बांधली अशी सर्जनशीलता लाभलेल्या मास्तरांनी अनेक नाट्यगीते, भावसंगीत आणि चित्रपट गीतांना चाली दिल्या आहेत.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘देव मज देवा’, ‘परब्रह्म निष्काम तो हा’, ‘धुंद मधुमती रात रे नाथ रे’, ‘देव म्हणे नाम्या पाहे’, ‘लख लख चंदेरी तेजाची..’, ‘अशी नटे ही चारुता’, ‘शर लागला तुझा गे’, ‘ओ शाम बजाए तोरे घर मे मुरलीया’ अशा गीतांचा नजराणा कलाकारांनी सादर केला. कार्यक्रमाची सांगता ‘अगा वैकुंठिच्या राया’ या बालगंधर्व यांनी अजरामर केलेल्या नाट्यगीताने करण्यात आली. अखेरीस मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘वंदे मातरम्’ या त्यांच्याच आवाजातील ध्वनीमुद्रित राष्ट्रगीत ऐकविण्यात आले.
मास्तर कृष्णराव फुलंब्रिकर यांना पांडुरंग मुखडे यांच्या शिष्यांच्या तबला वादनाने अभिवादन करण्यात आले. विकास कुचेकर, अमित लिमये, केतकी वैद्य आणि ओंकार श्रोत्री यांचे तबला वादन झाले. त्यांना पांडुरंग मुखडे यांनी लहेरा साथ केली.मान्यवर आणि कलाकारांचा सत्कार जान्हवी जानकर, पांडुरंग मुखडे, अभय जबडे यांनी केला. प्रास्ताविक अभय जबडे यांनी केले तर सूत्रसंचालन विघ्नेश जोशी यांचे होते.
जाहिरात