गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आयसीसीआर, भारतीय विद्या भवनतर्फे रविवारी
सानिया पाटणकर यांचे गायन तर आस्था कार्लेकर यांचा कथक नृत्याविष्कार !!
पुणे : केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालय आणि भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 17) सूरमणी सानिया पाटणकर यांचे गायन तसेच आस्था गोडबोले-कार्लेकर यांच्या कथक नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार यांनी निवेदनाद्वारे दिली.
आस्था गोडबोले-कार्लेकर
कार्यक्रम रविवार, दि. 17 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भारतीय विद्या भवनमधील सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
सानिया पाटणकर या बहुमुखी गायिका असून रागाच्या रचनेचे सौंदर्य सादरीकरणातून उलगडून दाखवितात. तसेच ख्याल, ठुमरी, दादरा, टप्पा, गझल, नाट्यगीत, भावगीत, भजन, अभंग, लोकसंगीत हे प्रकार त्या मोठ्या ताकदीने हाताळतात. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी लीलाताई घारपुरे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली.
पुढे जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका व गुरू डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडून 14 वर्षे गायन प्रशिक्षण घेतले असून डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडून टप्पा गायकीची तालिम घेतली आहे. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, तानसेन महोत्सव, एलोरा महोत्सव अशा अनेक महोत्सवात त्यांना सादरीकरणाची संधी मिळाली आहे. भारतासह परदेशातही त्यांनी मैफली गाजविल्या आहेत.
सानिया पाटणकर,
कथक नृत्यांगना व रंगकर्मी आस्था गोडबोले-कार्लेकर यांनी नृत्याचे शिक्षण आई व गुरू सविता गोडबोले यांच्याकडून गुरूशिष्य परंपरेतून घेतले आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी नृत्य प्रशिक्षणास सुरुवात केली. अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या आस्था यांना त्यांच्या आई-गुरू यांनी उत्तम कलाकार म्हणून घडविले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आईसमवेत रंगमंचावार पाऊल ठेवले.
वडिल डॉ. उदयकुमार गोडबोले यांनी कायमच प्रोत्साहन दिले. 13 वर्षे कथक प्रशिक्षण घेतल्यानंतर आस्था यांनी तीन वर्षांचा नाट्य शास्त्राचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. देश-परदेशात त्यांचे नृत्याचे अनेक कार्यक्रम सादर झाले आहेत.
—————————————————————
जाहिरात