गोल्डन आय न्यूज नेटवर्क
शंभर स्त्री कलाकार, शंभर मिनिटे आणि शंभर टक्के सत्यकथा !!
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘हॅलो सखी’चा रंगला अनोखा प्रयोग !!
पुणे : काळ बदललाय, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात वाटचाल करीत आहेत, महिलांनी यशाची शिखरे गाठली आहेत असे आपण आज जरी पहात असलो तरी ‘ती’ला तिचे अस्तित्व खऱ्या अर्थाने सापडले आहे का? ‘ती’ खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली आहे का? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.
महिलांच्या अशाच काही व्यथा ‘हॅलो सखी’ या अनोख्या नाट्यकृतीतून मांडण्यात आल्या आहेत.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘अक्षरसेवा’ प्रस्तुत ‘हॅलो सखी’ हा दीर्घांक गुरुवारी भरत नाट्य मंदिरात सादर करण्यात आला. याचे लेखन आणि दिग्दर्शन विनीता पिंपळखरे यांचे होते.
या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 100 स्त्री कलाकारांनी 100 मिनिटात छोट्या-छोट्या प्रवेशाच्या माध्यमातून सादर केलेले प्रसंग. बालकलाकारांसह सत्तरी ओलांडलेल्या महिलांचाही सहभाग होता. गायक, संगीतकार धनश्री गणात्रा, निवृत्त स्टेट बँक अधिकारी सीता खत्री, सामाजिक कार्यकर्त्या सरोजा नागराज आणि गिर्यारोहक हेमा राव यांनी अतिथी कलाकारांच्या भूमिकेतून आपली यशोगाथा महिलांसमोर मांडली.
स्त्रीच्या स्वभावाचे विविध कंगोरे, तिची बलस्थाने, स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी तिची होणारी तडफड अशा प्रसंगांची मांडणी दूरचित्रवाणीवरील चर्चात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली. सादरीकरणातील हे वेगळेपण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
शतकानुशतके महिलांवर होणारे अत्याचार, त्यांना मिळणारी गुलामासारखी वागणूक, परंपरांचा लादलेला बडगा, अयोग्यपद्धतीने अनेक माध्यमातून होणारे स्त्रीत्वाचे ओंगळवाणे प्रदर्शन, तिच्या मनातील भयगंड, सामाजिक स्तरावर तिच्यावर लादली गेलेली बंधने, दडपणे अशा अनेक विषयांना विविध प्रसंगातून वाचा फोडण्यात आली.
अशा नकारात्मक परिस्थितीतही स्त्रीने दाखविलेली जिद्द, स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी तीची चालेलली धडपड, ध्येयाकडे सुरू असलेली वाटचाल यातून सकारात्मकतेचा संदेशही देण्यात आला.
—————————–_——————————-
जाहिरात