गोल्डन आय न्यूज नेटवर्क
लोकमान्य हास्ययोग संघाचा बुधवार-गुरुवारी रौप्यमहोत्सवी कार्यक्रम !!
पुणे : लोकमान्य हास्ययोग संघातील सदस्यांच्या शारीरिक, मानसिक, वैचारिक, आध्यात्मिक, कौटुंबिक आणि सामाजिक अशा सर्वांगिण विकासासाठी तसेच सामाजिक कार्यात सहभागी होत असलेल्या लोकमान्य हास्ययोग संस्थेचा स्थापनादिन आणि रौप्यमहोत्सवी कार्यक्रम बुधवार, दि. 6 आणि गुरुवार, दि. 7 रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद आंबिकर, कार्याध्यक्ष बंडोपंत फडके, सविच स्मिता मोहिते यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
दोनही दिवस आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहेत. या प्रसंगी सदस्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही होणार आहेत.
संस्थेचा स्थापनादिन आणि रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. 6 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची या वेळी विशेष सन्माननिय उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा मित्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव असणार आहेत. तर सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे प्रमुख पाहुण्या आहेत.
लोकमान्य हास्ययोग संघ सदस्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करते त्याच प्रमाणे समाजाचे आपणही काही देणे लागतो या कर्तव्य भावनेतून समाजातील गरजूंनाही लोकमान्य हास्ययोग संघाने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे.
विविध विषयांवर तज्ज्ञांची भाषणे, व्याख्याने देखील संघातर्फे आयोजित केली जातात. विविध शाळा, महाविद्यालये, कार्यालये, आयटी संस्थांमध्ये जाऊन मानसिक तणाव निर्मूलनासाठी तसेच शारीरिक स्वास्थ्यासाठी हास्ययोगाचे मार्गदर्शन विनामूल्य देण्यात येते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद आंबिकर, कार्याध्यक्ष बंडोपंत फडके यांनी निवेदनाद्वारे दिली.
जाहिरात