गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गुणवत्तापूर्ण कामातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्धी होईल : प्रसाद कुलकर्णी !!
पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा 49वा स्थापना दिवस साजरा
वार्षिक पुरस्कारांचे वितरण !!
पुणे : पुणे ही माझी कर्मभूमी असली तरी माझ्या जन्मभूमीसाठी देखील मी उद्योग-व्यवसाय क्षेत्रात प्रगती करू इच्छित आहे. ज्यायोगे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न बघताना भारत उत्पादन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने ग्रामीण भागात पुरेशा व्यवस्था उपलब्ध करून गुणवत्तापूर्वक काम केल्यास भारताच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील आणि विकास साधला जाईल, असे प्रतिपादन सॅप पार्टस्चे कार्यकारी संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
पीएमए आयोजित कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त व्यावसायिकांसमवेत प्रदीप तुपे, बाळ पाटील, सम्राट फडणीस, प्रसाद कुलकर्णी, ऋषिकेश धांडे, राहुल जोशी आदी.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा (पीएमए) 49वा स्थापना दिवस आणि वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा ऑटो क्लस्टर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रसाद कुलकर्णी बोलत होते. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदीप तुपे, राहुल जोशी तसेच ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ॲकॅडेमिक अलायन्सचे ऋषिकेश धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर : राजेंद्र चोडणकर, फर्स्ट जनरेशन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर : के. केशवन, वुमेन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर : स्वाती वितोंडे, ॲकॅडमिक इन्स्टिट्यूट ऑफ द इयर : एसपीपीयू, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम, एनजीओ विथ सोशल इम्पॅक्ट : सेवा वर्धिनी, इन्क्युबेटर ऑफ द इयर : एआयसी पिनॅकल, स्टुडस्टंस् चॅप्टर ऑफ द इयर : एआयएसएसएमएस, सीओई ऑफ द इयर : पीएमए सीओई – एचआर, एक्सपोर्टर ऑफ द इयर : सुप्रिया लाईफसायन्स लि. यांचा या प्रसंगी गौरव करण्यात आला.
पुरस्कारांचे वितरण तसेच एचआर मित्र या त्रैमासिकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, ग्रामीण भागात उद्योग-व्यवसाय वाढीस लागल्यास शिक्षित युवा पिढीचा मोठ्या शहरांकडे असलेला ओढा कमी होऊन शहरी व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
सम्राट फडणीस म्हणाले, उद्योग, व्यवसाय, शिक्षण यासह पुण्याची सांस्कृतिक ओळखही महत्त्वाची आहे. या क्षेत्रांमध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. उद्योग, व्यवसाय क्षेत्रात भरारी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनने दीपस्तंभासारखे कार्य करत रहावे.
झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे काय होईल, याचा पुरेसा अंदाज नसल्यामुळे पीएमए सारख्या संस्थांनी स्वत:च्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवावी. उद्योजक आणि व्यावसायिकांनी भारतीय संस्कृती व्यवस्थापनातील कौशल्य, संयम बाळगत नेटाने प्रगती करावी. भारतीय संस्कृतीला लाभलेला अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा धागा धरून ठेवत यशस्वी व्हावे.
शैक्षणिक संस्था आणि उद्योग-व्यवसायातील संधी यांच्यातील परस्पर संबंध उलगडत ऋषिकेश धांडे म्हणाले, विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. या करिता विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन या विषयात गेली 25 कार्यरत आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थी फक्त पुस्तकी शिक्षण न घेता प्रत्यक्ष कार्यक्षेत्राविषयी माहिती प्राप्त करून घेत भविष्यातील उज्ज्वल वाटा शोधू शकतो.
स्वागतपर प्रास्ताविकात बाळ पाटील यांनी पीएमएच्या 49 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. नव्या तंत्रज्ञानाला आपलेसे करत व्यवस्थापन विकास क्षेत्रात पीएमएतर्फे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रसाद मिरासदार आणि डॉ. संजय गांधी यांनी करून दिला. प्रा. अभिजित खुरपे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. निधी बिष्णोई, डॉ. गिरीश तेलंग यांनी सूत्रसंचालन केले तर आभार राहुल जोशी यांनी मानले.