गोल्डन आय न्यूज नेटवर्क
तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्कार सुनीती लिमये यांना प्रदान !!
पुणे : कै. सौ. तिलोत्तमा प्रकाश निफाडकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मानाचा कर्मयोगिनी पुरस्कार यावर्षी कवयित्री, गझलकारा सुनीती लिमये यांना तनुजा चव्हाण आणि नितिन चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तनुजा चव्हाण या आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार दरवर्षी प्रदान करीत आहेत. कर्मयोगिनी पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री मृणालिनी कानिटकर-जोशी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते.
कोणताही साहित्यप्रकार असो त्याचा हेतू समाजमनाची मशागत करणे हाच असायला हवा.
कै. सौ. तिलोत्तमा प्रकाश निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित नितीन चव्हाण, तनुजा चव्हाण, सुनीती लिमये, मृणालिनी कानिटकर-जोशी, ॲड. प्रमोद आडकर
मग ते निखळ मनोरंजन, प्रबोधन, दिशादर्शन असेल किंवा अन्यायावर प्रहार करणारे असेल, तक्रार, दुःखाची मांडणी असेल; पण ह्या साहित्याच्या वाचनातून माणूस घडला पाहिजे आणि माणसाला माणूस जोडला पाहिजे हे खरं.
आजच्या कर्मयोगिनी पुरस्कारानिमित्त ते नक्की साध्य झाले आहे, असे मत मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी व्यक्त केले.
ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, आजच्या काळात मुले पालकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे, त्यांना मानसन्मन देत नसल्याचे अनेक घटनांमधून दिसून आले आहे. मात्र तनुजा चव्हाण यांनी आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार देऊन कृतज्ञता व्यक्त करीत आहेत ही समाजाच्या दृष्टीने आदर्शवत घटना आहे.
कर्मयोगिनी पुरस्कारप्राप्त प्रतिभा पवार, सुजाता पवार, योगिनी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
कर्मयोगिनी पुरस्कारानिमित्त गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात प्रमोद खराडे, भूषण कटककर, अमृता जोशी, मिलिंद छत्रे, कुमार चव्हाण, बबन धुमाळ, स्वाती यादव, सानिका दशसहस्त्र यांनी गझल सादर केल्या. निवेदन क्षितिज चव्हाण, सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. आभार दर्शना चव्हाण यांनी मानले.
जाहिरात