गोल्डन आय न्यूज नेटवर्क
श्यामल करंडकावर प्रिया उंडे यांची मोहोर !!
एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी आयोजित श्यामल करंडक एकपात्री स्पर्धेचे पारितोषिक वितरण !!
पुणे : एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी आयोजित श्यामल करंडक एकपात्री स्पर्धेत प्रिया उंडे (मुरमुरऱ्याचे पोते) यांनी प्रथम क्रमांकाचा श्यामल करंडक पटकाविला. त्यांना पाच हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. द्वितीय पारितोषिक, तीन हजार रुपये, स्मृतीचिन्ह अक्षता साळवी (दगड) आणि तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह ज्योती ब्रह्मे (आपलं जग) यांना मिळाले.
एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी आयोजित श्यामल करंडक एकपात्री स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसमवेत अनुजा कोल्हटकर, अशोक कुलकर्णी, भाग्यश्री देशपांडे, डॉ. संगीता बर्वे, सुरेश देशमुख, अंजली कऱ्हाडकर, स्वाती महाळंक आदी .
स्नेहा कुलकर्णी (धत्तुरीचं फुल) आणि अनघा बुरसे (समास) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
केवळ महिलांसाठी ज्येष्ठ एकपात्री कलाकार सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ श्यामल करंडक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक फेरीतून निवडलेल्या दहा स्पर्धकांची अंतिम फेरी सोमवारी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
पारितोषिक वितरण साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे, निळू फुले कला अकादमीचे अध्यक्ष सुरेश देशमुख, प्राथमिक फेरीच्या परीक्षक अपर्णा डोळे, प्रिया नेर्लेकर, अंतिम फेरीच्या परीक्षक अंजली कऱ्हाडकर, स्वाती महाळंक, श्यामल कुलकर्णी यांचे पती अशोक कुलकर्णी, कन्या अनुजा कोल्हटकर, एकपात्री कलाकार परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री देशपांडे यांची प्रमुख उपस्थितीत झाले.
स्पर्धेच्या माध्यमातून महिला चांगल्याप्रकारे व्यक्त झाल्याबद्दल स्पर्धकांचे अभिनंदन करून डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, एकपात्री स्पर्धेच्या माध्यमातून महिलांनी कळत-नकळतपणे आपल्या मनातील भाव-भावनांना वाट करून दिली. त्या पुढे म्हणाल्या, नाटक हे व्यक्त होण्याचे आणि विकसित होण्याचे एक सशक्त माध्यम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा नक्कीच उपयोग करून घ्यावा. देवी, लक्ष्मी यांच्या स्त्रीरूपासमोर जसे नतमस्तक होता तसेच महिला या माणूस आहेत यांचे भान पुरुषांनी राखले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेविषयी बोलताना अनुजा कोल्हटकर म्हणल्या, सादरीकरणात महिलांनी वैविध्य राखले. गंभीर, विनोदी आणि सद्यपरिस्थितीवरील महिलांचे सादरीकरण लक्ष्यवेधी होते. वय वर्षे 20 पासून ते सत्तरी पार केलेल्या महिला उत्साहाने व आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धेसाठी निवडलेली संहिता अधिक सशक्त, परिणामकारक हवी, त्यात वैविध्य हवे अशी अपेक्षा अंजली कऱ्हाडकर यांनी व्यक्त केली. महिलांचा रंगमंचावरील वावर आत्मविश्वासपूर्ण वाटला. स्पर्धेचा निकाल स्वाती महाळंक यांनी जाहीर केला.
सुरुवातीस श्यामल कुलकर्णी यांच्या अभिनयाची झलक दृक-श्राव्य माध्यमातून दाखविण्यात आली. मान्यवरांचे स्वागत सुरेश देशमुख, अनुजा कोल्हटकर, अशोक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन एकपात्री कलाकार परिषदेच्या सचिव, स्पर्धा प्रमुख पल्लवी परब-भालेकर यांनी मानले.
जाहिरात