गोल्डन आय न्यूज नेटवर्क
निर्मला-श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेत ‘आजी चोर आणि लॉकडाऊन’ला प्रथम क्रमांक !!
विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे आयोजन : डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण !!
पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित निर्मला-श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेत साधना गोखले यांच्या ‘आजी चोर आणि लॉकडाऊन’ या कथेला प्रथम क्रमांक आणि पाच हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित निर्मला-श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेतील विजेत्यांसमवेत डॉ. गिरीश ओक, विजय पटवर्धन, माधवी सोमण, मधुरा टापरे आदी.
विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. स्पर्धेत राज्यातील 23 लेखकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल आज (दि. 12) जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर प्रख्यात लेखक, अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. निळू फुले कला अकादमी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन, मधुरा टापरे, माधवी सोमण यांची या वेळी उपस्थिती होती. प्रसिद्ध निवेदक राजेश दामले आणि प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते दीपक रेगे यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.
द्वितीय पारितोषिक आणि तीन हजार हजारांचा पुरस्कार नागेश शेवाळकर यांच्या ‘स्वयंपाकाची गोष्ट’ या कथेला, तृतीय पारितोषिक आणि दोन हजार रुपयांचा पुरस्कार शिवाजी देशमुख यांच्या ‘आजीबाई’ या कथेला तर उत्तेजनार्थ पारितोषिक योगेश शिंदे यांच्या ‘सॅन्डविच’ या कथेला देण्यात आले.
राहुल भालेराव, योगेश शिंदे, शिवाजी देशमुख, नागेश शेवाळकर यांनी कथांचे अभिवाचन केले.
या वेळी बोलताना डॉ. गिरीश ओक म्हणाले, साध्या-सोप्या शब्दात खुसखुशीत लेखन करणे फार अवघड असते. असे लेखन करायला वेगळी दृष्टी लागते.
स्पर्धेसाठी कथा पाठविताना विषयाची मांडणी कशी असावी, विस्तार किती असावा आणि काय साध्य करायचे आहे, याचा विचार केला जावा, अशी अपेक्षा स्पर्धेचे परिक्षक राजेश दामले यांनी व्यक्त केली.
सुरुवातीस फाऊंडेनचे अध्यक्ष विजय पटवर्धन यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत बीना रानडे, शुभदा परदेशी, अभिजित इनामदार यांनी केले.
——————————————- ——————जाहिरात