गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नटरंग कलागौरव पुरस्काराने नम्रता संभेराव तर नटरंग सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सागर बगाडे यांचा गौरव !!
पुणे : कलेच्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीस नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या कलागौरव तसेच सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीमत्वांची निवड करण्यात आली आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नटरंग ॲकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध कलांचे प्रशिक्षण देण्याबरोबरच स्व. गिरीश बापट यांचे कार्य पुढे नेले जात आहे, याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
नटरंग ॲकॅडमी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारार्थी नम्रता संभेराव, सागर बगाडे यांच्यासह चंद्रकांत पाटील, हेमंत रासने, स्वरदा बापट, जतीन पांडे, लीला गांधी, जयमाला इनामदार, सुनील बल्लाळ, ललित जैन, दत्ता सागरे, दादा पासलकर, विजय कडू, राजेश येनपुरे आदी.
नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या 31व्या स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठानच्या कलागौरव पुरस्काराने लोकप्रिय विनोदी अभिनेत्री नम्रता संभेराव तर तिसऱ्या स्व. गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने राष्ट्रपती पदक विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांचा आज (दि. 20) गौरव करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. आमदार हेमंत रासने अध्यक्षस्थानी होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, महावस्त्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास नटरंग ॲकॅडमीच्या अध्यक्षा स्वरदा बापट, कार्याध्यक्ष जतिन पांडे, विश्वस्त ललित जैन तसेच माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, मनपा उपायुक्त सुनील बल्लाळ, शाहीर परिदषचे अध्यक्ष दादा पासलकर, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, विजय कडू, राजेश येनपुरे आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभानिमित्त नटरंग कला ॲकॅडमीच्या 150 कलाकारांचा नृत्यरंग हा कार्यक्रम झाला.
कलाक्षेत्रातील नम्रता संभेराव यांच्या कार्याचे कौतुक करून चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, सामाजिक क्षेत्रात सागर बगाडे यांचे कर्तृत्व मोठे आहे. गरजेवर आधारित सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार आहे.
सत्काराला उत्तर देताना नम्रता संभेराव म्हणाल्या, रसिक प्रेक्षकांशिवाय आम्हा कलाकारांचा प्रवास अपूर्ण आहे. कलागौरव पुरस्कराच्या माध्यमातून कलेच्या क्षेत्रात उत्साहाने प्रेरणा घेऊन नव्या जोमाने कार्य करण्यास तयार आहे.
सागर बगाडे म्हणाले, गिरीश बापट यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कराचे मोल मोठे आहे. पुरस्काराचे पावित्र्य ठेवून सामाजिक कार्यातील वाटचाल कायम ठेवणार आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आमदार हेमंत रासने म्हणाले, नटरंग ॲकॅडमीसारख्या संस्था कलेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असल्याने पुण्याची सांस्कृतिक राजधानी ही ओळख कायम आहे. पुरस्कारांसाठी केलेली निवड समर्पक आहे.