गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आसामी सत्त्रिया नृत्यविष्कारातून साकारले गीतरामायण
आयसीसीआर आणि भारती विद्यापीठातर्फे आयोजन !!
पुणे : सत्त्रिया या आसामी नृत्याद्वारे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर गीतरामायणाचे विलोभनिय सादरीकरण करण्यात आले. आसामी नृत्यप्रकार आणि मराठी गीतरामायणाचा हा अनोखा सांस्कृतिक मिलाफ पुणेकर रसिकांना या निमित्ताने अनुभवायला मिळाला.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालय आणि भारती विद्यापीठाअंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सत्त्रिया या नृत्यविष्काराविषयी तसेच तबला वादनाविषयी सप्रयोग व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
त्या वेळी डॉ. देविका बोरठाकूर आणि त्यांच्या शिष्य-सहकलाकारांनी हा अनोखा नृत्याविष्कार सादर केला. तर किशोर कोरडे यांनी तबलावादनाविषयी मार्गदर्शन व सादरीकरण केले. भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज ऑडिटोरियमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार, कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी, भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्चे डीन विवेक रणखंबे, आबेदा इनामदार कॉलेजच्या प्रा. डॉ. मुकुल माडगूळकर-जोशी तसेच ज्येष्ठ नृत्यगुरू सुचेता भिडे-चापेकर, ज्येष्ठ नृत्यगुरू स्वाती दैठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्येष्ठ तबलावादक किशोर कोरडे यांनी बनारस घराण्याच्या तबला वादनशैलीबाबत माहिती देऊन तबला वादनातील उठान, अवजार (आलाप, जोड, झाला), कायदा, रेला, परण सादर केले.
तबला हे साथीचे वाद्य आहे असे सांगून कोरडे यांनी गायक परिमल कोल्हटकर यांनी सादर केलेल्या राग श्रीमधील अनंत मनोहर जोशी यांच्या ‘चलोरी माई राम सिया दर्शन को’ या रचनेला तबला साथ केली. ओंकार उजगरे यांनी लेहरा साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. देविका बोरठाकूर यांनी अक्षता माने, साक्षी गायकवाड, अनुराधा नलावडे, योशा रॉय, तन्वीर लांबा, बिपांची बोरठाकूर, ओशीन झाडे या शिष्यांसह सत्त्रिया हा नृत्यप्रकार सादर केला. डॉ. बोरठाकूर यांनी सादरीकरणाची सुरुवात ‘शांताकारम् भूजगशयनम्’ या श्लोकावर रचित नृत्याने केली. त्यानंतर पारंपरिक सूत्रधारी नाच सादर केला. भतीमा प्रकारात कालियादमन अनिक्य नात सादर करताना पुतनावधाचा प्रसंग साकारला.
यानंतर सत्त्रिया या नृत्याविष्कारातून गीतरामायणातील रामजन्म, त्राटिकावध, सीता स्वयंवर, राजा दशरथ यांनी कैकेयीला दिलेल्या वचनाची पूर्तता, राम, सीता आणि लक्ष्मणाचे वनवास गमन, शूर्पणखेला घडविलेली अद्दल, सीतेची कांचनमृगाची मागणी, सीताहरण, हनुमंत आणि सीताभेट, वानरसेनेच्या मदतीने सेतूबांधणी, राम-रावण युद्ध असे प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आले.
या अनोख्या नृत्यविष्कारातून पहिल्यांदाच सादर करण्यात आलेल्या गीतरामायणाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत ‘जय श्रीराम’ असा जयघोष केला. निकिता लेले, परिमल कोल्हटकर (गायन), ऋषिकेश सुरवसे (तबला), नुपूरज्योती मेधी (खोल), वरद सोहनी (संवादिनी), ओंकार उजगरे (सिंथेसायझर), निशाद चिले (साईड ऱ्हिदम) यांनी साथसंगत केली.
सत्त्रिया या नृत्यप्रकारावर सादर करण्यात आलेल्या गीतरामायणाचे डॉ. मुकुल माडगूळकर-जोशी यांनी कौतुक केले. ज्येष्ठ नृत्यगुरू सुचेता भिडे-चापेकर, स्वाती दैठणकर, विवेक रणखंबे यांनी मनोगत व्यक्त केले.
कलाकार आणि मान्यवरांचे स्वागत आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार यांनी केले. सूत्रसंचालन अनुप्रिता लेले यांनी केले. आभार संजीवनी स्वामी यांनी मानले.
जाहिरात