गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गांधर्व महाविद्यालयातर्फे गुरुवार, शुक्रवारी बुजुर्ग कलावंत सन्मान सोहळा, सांगीतिक मैफलीचे आयोजन !!
पुणे : गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय, नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुजुर्ग कलावंत सन्मान सोहळा आणि सांगीतिक मैफली असा दोन दिवसीय सोहळा येत्या गुरुवारी (दि. 18) आणि शुक्रवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला असल्याची माहिती गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी दिली.
आयुष्यभर सांगीतिक विद्यादानाचे कार्य करणाऱ्या तसेच ज्येष्ठ कलावंतांचा गेल्या 20 वर्षांपासून सन्मान करण्यात येत आहे. गुरुवार, दि. 18 रोजी जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित विनोद डिग्रजकर, विदुषी शुभदा पराडकर या ज्येष्ठ गायकांचा सन्मान आणि सांगीतिक मैफल आयोजित करण्यात आली आहे.
संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रसिद्ध सतार वादक उस्ताद उस्मान खाँसाहेब यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
शुक्रवार, दि. 19 रोजी राजाभाऊ शेंबेकर आणि विदुषी अलका देव मारुलकर यांचा सत्कार आणि मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी सांभाळून अनेक तबलावादक घडविणारे पंडित विनायक फाटक यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजित रावेतकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कलाकारांना प्रवीण कासलीकर, हर्षल काटदरे, प्रमोद मराठे (संवादिनी), महेश देसाई, संजय देशपांडे, प्रथमेश देवधर, पं. रामदास पळसुले (तबला) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम दोनही दिवस सायंकाळी 6 वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात