गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नम गुगल प्राध्यापक; पद्म पुरस्काराने गौरव व्हावा : डॉ. शां. ब. मुजुमदार !!
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्थेतर्फे डॉ. न. म. जोशी यांचा विशेष सत्कार !!
पुणे : डॉ. न. म. यांची ज्ञानसंपन्नता, उत्तम स्मरणशक्ती व तल्लख बुद्धी ही अचंबित करणारी आहे. त्यांची ज्ञानसाधना महान आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारे ते माझ्या दृष्टीने गुगल प्राध्यापक आहेत. कार्यकर्तृत्वाने संपन्न अशा व्यक्तीचा गौरव पद्म पुरस्काराने व्हावा, त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे अशी सदिच्छा सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केली. मिळालेला पद्म पुरस्कार इतरांना देण्याची सुविधा असती तर मी माझा पद्मभूषण पुरस्कार न. म. जोशी या सन्मित्राला तात्काळ देण्यास तयार आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्था, पुणे आयोजित सत्कार सोहळ्यात (डावीकडून) ॲड. एस. के. जैन, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. सदानंद मोरे, डॉ. न. म. जोशी, राजन लाखे, किशोर सरपोतदार.
डॉ. न. म. जोशी यांचा 89वा वाढदिवस आणि त्यांच्या शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील योगदानास 70 वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. जोशी यांचा डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते आज (दि. 11) विशेष सत्कार करण्यात आला.
त्या वेळी डॉ. मुजुमदार बोलत होते. स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, शिक्षण प्रसारक मंडळीचे कार्याध्यक्ष ॲड. एस. के. जैन, पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक किशोर सरपोतदार, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्था, पुणेचे अध्यक्ष राजन लाखे व्यासपीठावर होते.
संवाद कार्यक्रमात डॉ. मंदार परांजे आणि डॉ. न. म. जोशी.
डॉ. मुजुमदार पुढे म्हणाले, डॉ. जोशी यांची ज्ञानसाधना महान आहे. त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पीएच.डी. केली आहे. तसेच त्यांना शासनाचे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहे ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मिळालेली दाद आहे. डॉ. जोशी याच्या ‘बखर एका सारस्वताची’ या आत्मचरित्राचे इंग्रजीत भाषांतर व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांपैकी आजच्या काळात डॉ. न. म. जोशी यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचे लिखाण संस्कारक्षम, नितीमूल्य पोहोचविणारे आहे. नैतिकमूल्यांचा ऱ्हास होण्याच्या काळात डॉ. जोशी यांच्यासारख्या शिक्षणतज्ज्ञांचे लेखन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे.
डॉ. न. म. जोशी यांनी कुठल्याही सन्मानासाठी अथवा पुरस्कारासाठी शिक्षण क्षेत्रात कार्य केले नाही, असे नमूद करून ॲड. एस. के. जैन म्हणाले, न. म. जोशी हे पुरस्काराला मोठे करणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच सर्व क्षेत्रातील लहानथोर व्यक्तींना ते प्रिय आहेत.
डॉ. न. म. जोशी लिखित हरी पाटकर या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते तर राजन लाखे यांच्या काव्यमय दिनदर्शिकेचे प्रकाशन ॲड. एस. के. जैन यांच्या हस्ते या प्रसंगी झाले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका राजन लाखे यांनी विशद केली.
सत्कार किशोर सरपोतदार आणि राजन लाखे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा जगताप यांनी केले तर आभार किशोर सरपोतदार यांनी मानले.
मराठी भाषेसाठी संस्थात्मक पातळीवर कार्य व्हावे
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. न. म. जोशी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. बालपणातील जडणघडण, जीवनातील आई-वडिलांचे स्थान, शैक्षणिक कारकिर्द, महाविद्यालयीन काळात अनेक महनीय व्यक्तींचा लाभलेला सहवास, साहित्य परिषदेत म. श्री. दीक्षित यांच्यामुळे झालेला प्रवेश याविषयी आठवणी जागविल्या.
साहित्य क्षेत्रातील पुरस्कार, चर्चासत्र, मुलाखती, जन्मदिन, उत्सव असे कार्यक्रम हे सार्वजनिक नळकोंड्याप्रमाणे असतात तर परीक्षा विभागातर्फे घेतले जाणारे उपक्रम हे अभिषेक पात्रासारखे असतात.
ज्यातून मराठी भाषेचे उन्नयन होण्यासाठी मदत होते, असे त्यांनी साहित्य परिषदेच्या परीक्षा विभागाच्या कार्यासाठी दिलेल्या देणगीमागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले. मराठी भाषेचे परिस्थिती सुधारण्यासाठी संस्थात्मक पातळीवर कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केली.
महात्मा गांधी, साने गुरुजी, श्यामची आई, एकता मासिक याविषयी केलेल्या विविधांगी लिखाणासंदर्भात बोलताना ते म्हणाले, लिखाण करते वेळी वैचारिक प्रक्रिया निराळी वाटली तरी ती परस्पर विरोधी नसते. आयुष्यातील संघर्षाविषयी बोलताना डॉ. जोशी यांनी प्राक्तन, प्रकृती आणि प्रवृत्ती या तीन प्रकारांना कशा पद्धतीने तोंड दिले याविषयी सांगितले. त्यांच्याशी डॉ. मंदार परांजपे यांनी संवाद साधला.
जाहिरात