गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘स्वरझंकार’मध्ये राजस्थानी लोकसंगीताचा दमदार आविष्कार !
पुणे : लोकसंगीताचा मनमुक्त खुलेपणा, सादरीकरणातील लवचिकता आणि मोकळेपणा यांचा अनोखा अनुभव देत प्रसिद्ध राजस्थानी लोककलावंत मामेखान आणि सहकाऱ्यांनी स्वरझंकार संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस (शुक्रवार) अक्षरशः गाजवला.
मामेखान आणि पूर्बायन चटर्जी
महोत्सवाच्या उत्तरार्धात मामेखान आपल्या सहकलाकारांसह पारंपरिक पोषाखात आपापल्या वाद्यांसह स्वरमंचावर दाखल झाले. तेव्हा या ‘फोक स्टार ऑफ राजस्थान’चे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
‘आवो नी पथारो मारो देस’ या पारंपरिक लोकगीत रचनेने मामेखान यांनी प्रारंभ केला. राजस्थानचे लोकजीवन, संस्कृती, सण, उत्सव आणि तो वारसा जपणारे हे कलाकार यांनी सादरीकरणात रसिकांनाही सहभागी करून घेतले. त्यामुळे ही पेशकश उत्तरोत्तर रंगत गेली. त्यांना अमर संगम (गिटार), सवाई खान (ढोलक), फिरोज खान (खडताल), जमाल खान (हार्मोनियम), सद्दाम (सारंगी) आणि निहाल कंबोज (की बोर्ड) यांनी रंगत वाढवणारी साथसंगत केली.
‘पुणे अच्छा लगता है कारण लोक रसिक आहेत, जाणकार आहेत आणि फार छान दाद देतात,’ अशा शब्दांत मामेखान यांनी पुणेकरांचे कौतुक केले.
या सर्व कलाकारांना सतारीचे झंकार घेऊन पूर्बायन चॅटर्जी सामील झाले आणि एक वेगळ्या नादाची प्रचिती रसिकांनी घेतली.
लोकसंगीत आणि सतारीचे बोल सवाल जवाब करत अखेरीस एकरूप झाले आणि ‘दमादम मस्त कलंदर’ या लोकप्रिय रचनेने त्यांनी सांगता केली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
जाहिरात