गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आई हे सर्वात्मक रूप : डॉ. श्रीपाल सबनीस !
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या आदर्श आई पुरस्काराने विजयाबाई मानकोसकर यांचा सन्मान !!
पुणे : भारतीय संस्कृती ही विश्वात्मक आहे. ईश्वरानंतर महनीय, वंदनीय रूप असते ते आईचे. आईला जात नसते ती कुठल्या देशाची, धर्माची नसते. आई हे सर्वात्मक रूप आहे. मुले जन्माला घालणे हे आईचे मोठेपण नाही मात्र विश्वात्मक विचारांचे संस्कार मुलांना देणे महत्त्वाचे ठरते, असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित आदर्श आई पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) संतोष मानकोसकर, सचिन ईटकर, ॲड. प्रमोद आडकर, विजयाबाई चंद्रकांतराव मानकोसकर, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. राजा दीक्षित, सुरेंद्र मानकोसकर.
काबाडकष्ट करून मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकीतून अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य खुलविणाऱ्या, ज्येष्ठ सनदी अधिकारी सुरेंद्र मानकोसकर यांच्या मातोश्री विजयाबाई चंद्रकांतराव मानकोसकर यांचा आज (दि. 23) रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे यंदाचा आदर्श आई पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्काराचे वितरण डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, ज्येष्ठ सनदी अधिकारी सुरेंद्र मानकोसकर, संतोष मानकोसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाल, मानपत्र, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
विजयाबाई मानकोसकर यांच्या कष्टप्रद कार्याचा गौरवाने उल्लेख करून डॉ. राजा दीक्षित म्हणाले, आई ही व्यक्ती आदर्शच असते. त्यातील काहींचे श्रेष्ठत्त्व मोठे असते. त्यांनी संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित करण्यासाठी कठोर प्रयत्न केल्याने डॉक्टरांचे घर गोकुळ झाले आहे.
विजयाबाई चंद्रकांतराव मानकोसकर यांनी कष्टप्रद जीवन जगत कुटुंबातील 12 जणांना डॉक्टर केले. दोन मुलांना उच्चपदस्थ अधिकारी बनविले. कुटुंबाच्या प्रगतीबरोबरच समाजाप्रती जाणिव ठेवून ग्लोबल थॉट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
त्यांच्या या कार्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. एकाचवेळी त्या सोनेही आहेत आणि परिसही. त्यांनी अनेक कुटुंबांच्या चरितार्थाचा प्रश्न सोडविला आहे. आजचा सन्मान हा स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा सन्मान आहे. जनमानसात स्त्रीविषयी समताभाव, आदरभाव रुजणे गरजेचे आहे, असे डॉ. दीक्षित म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना विजयाबाई मानकोसकर म्हणाल्या, माझ्या मुलांसारखी मुले इतर महिलांना मिळो. मी मुलांना योग्य ते वळण द्यायचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे त्यांनी उत्तम मार्गक्रमण केले.
मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले. या मुलांच्या रूपाने मला हिरे मिळाले आहेत. आज मुलांच्या नावे माझी ओळख करून दिली जाते याचे मला कौतुक व आनंद आहे.
सचिन ईटकर म्हणाले, स्त्रियांना सक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. भविष्यात स्त्रिया सक्षम झाल्या तर देशाचा विकासाचा तो पाया ठरेल. मानकोसकर कुटुंब हे आदर्श कुटुंब असून विजयाबाईंच्या संस्कारांनी या कुटुंबियांना आजही एकजूट ठेवले आहे.
सुरेंद्र मानकोसर म्हणाले, आईची जिद्द व कष्टांमुळे आम्हाला प्रेरणा मिळाली व आम्ही अतिशय खडतर परिस्थितीतही शिक्षणात मोठे यश मिळविले. आमच्या आईचे संस्कार संपूर्ण कुटुंबाला पुढे आणण्यासाठी कारणीभूत आहेत.
आईचा हात डोक्यावर असे पर्यंत जगातील सर्व सुखे मिळू शकतात. आई हे जगण्याचे माध्यम आहे.
सुरुवातीस रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विशद करतांना सांगितले की, समाजाला प्रेरणा मिळावी हा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून संस्थेतर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कवी उद्धव कानडे यांनी केले.
जाहिरात