गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘संतसाहित्यातील मूल्यविचार’ ग्रंथ तरुण पिढीसाठी शिदोरी : डॉ. सदानंद मोरे .!
प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रंथप्रकाशन!!
पुणे : संतांच्या विचारांचा संबंध हा मूल्यांशीच आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ही मूल्ये संतविचारांमध्ये प्रकर्षाने आढळून येतात. ‘संतसाहित्यातील मूल्यविचार’ हा ग्रंथ आजच्या तरुण पिढीसाठी शिदोरी म्हणून उपयुक्त ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केला.
संतांचे साहित्य आणि कार्याविषयी आस्था बाळगून आयुष्याची प्रेरणादायी वाटचाल करणारे प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते अमृतमहोत्सव गौरव समिती संपादित आणि अनुबंध प्रकाशन प्रकाशित.
संतसाहित्यातील मूल्यविचार’ ग्रंथप्रकाशन प्रसंगी उपस्थित अनिल कुलकर्णी, डॉ. सदानंद मोरे, प्राचार्य शिवाजीराव मोहिते, आमदार दिलीपराव मोहिते-पाटील, ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर, डॉ. राजा दीक्षित, डॉ. अविनाश सांगलेकर.
संतसाहित्यातील मूल्यविचार’ या ग्रंथाचे प्रकाशन आज (दि. 17) डॉ. सदानंद मोरे, ह. भ. प. चैतन्यमहाराज देगलूरकर (पंढरपूर, जि. सोलापूर) आणि महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थित झाले. त्या वेळी डॉ. मोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीपराव मोहिते-पाटील होते.
अनुबंध प्रकाशनचे संचालक अनिल कुलकर्णी, गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सांगोलेकर व्यासपीठावर होते. डॉ. सुलभा शिवाजीराव मोहिते लिखित ‘स्त्री संत साहित्यातील संवाद तत्त्वे’ या पुस्तकाचे प्रकाशनही याप्रसंगी करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात असलेल्या गणेश हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. प्राचार्य शिवाजीराव मोरे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, जी मूल्ये अशा ग्रंथांमधून समाजाच्या अंतरंगापर्यंत अभिव्यक्त झालेली असतात त्या अभिव्यक्तीचे मूळ, अभिव्यक्तीचे अधिष्ठान हे निश्चितच आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाचे असते. ही मूल्ये स्थिर, शाश्वत आणि परिपूर्ण असे फल प्राप्त करून देतात. अशी मूल्ये संतवाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी आढळून येतात. संतांच्या कृतीतून मूल्ये दिसून येतात.
मूल्यांची चर्चा करणारा असा हा ग्रंथ असल्याचे डॉ. राजा दीक्षित म्हणाले. विधायक भूमिकेतून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रथांत मांडलेल्या समतेच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत.अशिक्षित आईकडून शिक्षणाची प्रेरणा मिळाली असे भावपूर्ण उद्गार काढून प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते म्हणाले, आईच्या संस्कारातून जीवनाची वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली.
आईनेच संत विचारांचा वारसा जगण्यात रुजविला. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने जीवनाची वाटचाल केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आमदार दिलीपराव मोहिते म्हणाले, सध्या सर्वत्र नकारात्मक परिस्थिती असताना ‘संत साहित्यातील मूल्यविचार’ या ग्रंथातून सकारात्मक विचार युवा पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
डॉ. शैलेश मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागतपर प्रास्ताविकत डॉ. अविनाश सांगलेकर यांनी अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल असा हा संदर्भग्रंथ असल्याचे नमूद केले. प्रास्ताविक आणि मान्यवरांचा सत्कार अनिल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती प्रभूमिराशी यांनी केले. आभार श्रीकांत चौगुले यांनी मानले.
जाहिरात