गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘संतसाहित्यातील मूल्यविचार’ ग्रंथाचा रविवारी प्रकाशन सोहळा !
प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त संतविचारांचे होणार समग्र दर्शन !
पुणे : संतांचे साहित्य आणि कार्याविषयी आस्था बाळगून आयुष्याची प्रेरणादायी वाटचाल करणारे प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘संतसाहित्यातील मूल्यविचार’ या अनोख्या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली असून या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी (दि. 17) आयोजित करण्यात आला आहे.
प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते अमृतमहोत्सव गौरव समिती संपादित आणि अनुबंध प्रकाशन प्रकाशित ‘संतसाहित्यातील मूल्यविचार’ या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ह. भ. प. चैतन्यमहाराज देगलूरकर (पंढरपूर, जि. सोलापूर) आणि महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीपराव मोहिते-पाटील असणार आहेत, अशी माहिती अनुबंध प्रकाशनचे संचालक अनिल कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, प्राचार्य डॉ. शिवाजीराव माहिते अमृतमहोत्सव समितीचे सदस्य श्रीकांत चौगुले, माधव राजगुरू या प्रसंगी उपस्थित होते.
ग्रंथ प्रकाशन सोहळा रविवार, दि. 17 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात असलेल्या गणेश हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
संतांचे साहित्य आणि कार्य याविषयी आजपर्यंत खूप काही लिहिले-बोलले गेले आहे. कोणी भाषेच्या, कोणी इतिहासाच्या अंगाने तर कोणी समाजकारणाच्या किंवा राजकारणाच्या अंगाने संतांचे चिंतन-मनन करून लेखन केले आहे. मात्र संतांच्या मूल्यविचारांना केंद्रस्थानी ठेवून अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथरूपाने वाचक, अभ्यासक यांच्यासाठी सादर केल्याचे आढळून येत नाही.
संत ज्ञानेश्वर यांच्यापासून संत निळोबाराय यांच्यापर्यंत महाराष्ट्राला जवळपास चार-पाच शतकांची संतांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संतपरंपरेत स्त्री संतांचीही परंपरा पाहावयास मिळते.
ज्यांच्या निमित्ताने गौरव ग्रंथ होत आहे त्या डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी ‘सकल स्त्री संतगाथा’चे संपादन करून संतसाहित्यात मोलाची भर घातलेली आहे. या निमित्ताने त्यांच्या या योगदानाकडेही अभ्यासकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.
‘वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय’, वारकरी साहित्यातील सांस्कृतिक चिन्हमीमांसा’, ‘संत तुकोबारायांचा राजधर्म’, ‘आध्यात्मिक जीवनमूल्ये’, ‘संत ज्ञानदेवकृत परिपाठाची सामाजिक उपयोगिता’, ‘बहेणाबाईची जीवनमूल्ये आणि जीवनदृष्टी’, ‘संतसाहित्यातील पुरोगामित्व’, ‘श्री चक्रधरस्वामींचा समतावाद’, ‘ज्ञानेश्वरीचे शब्दवैभव’, ‘स्त्री जन्म मणवुनी न व्हावे उदास – संत जनाबाई’, ‘संतसाहित्य आणि आधुनिक काळातील युवाविश्व’, ‘श्री समर्थांचा राजधर्म’ यासह जवळपास 41 लेखांचा समावेश असलेला हा ग्रंथ आहे.
पुणे-मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मान्यवर लेखकांनी या ग्रंथासाठी योगदान दिले आहे. जवळपास चारशे पानांचा हा गौरवग्रंथ आहे.
जाहिरात