गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘स्वरानुभूती’ मैफलीद्वारे भारती प्रथाप यांचे आग्रा घराण्याच्या गायकीचे प्रभावी दर्शन !
पुणे : ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आयोजित ‘स्वरानुभूती’ मैफलीत चतुरस्र गायिका भारती प्रथाप यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून आग्रा घराण्यातील रचनाकारांच्या शैलीचे अनोखे दर्शन घडविले
रचनांमधील बढत, ताना रसिकांना विशेषत्वाने भावल्या.
कोथरूड येथील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. आग्रा घराण्याच्या दमदार गायकीचा वारसा पुढे नेणाऱ्या भारती प्रथाप यांनी मैफलीची सुरुवात राग पुरिया कल्याणमधील विलंबित एकतालातील ‘होवन लगी सांझ, चेतो जरा मोमनावरे, अब तो याद करो नाम हरिको ध्यान धरे’ या रचनेने केली.
त्यानंतर द्रुत तीन तालातील ‘धन धन भाग जागे आज मेरे आंगन’ ही रचना सादर केली. या दोन्ही रचना पंडित अण्णासाहेब रातंजनकर यांच्या आहेत.
हमीर रागातील मध्य तीन तालातील ‘मन मोहना ब्रिज राजा दुलारो’ ही रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या नंतर उस्ताद इनायत खान रचित द्रुत आडा चौतालातील ‘देखी ऐसी प्यारी लाडली की सुंदरा’ ही रचना सादर केली. आग्रा घराण्याच्या उस्ताद फैय्याज खान यांनी लोकप्रिय केलेले आणि आग्रा घराण्याचे वैशिष्ट्य असलेले ‘नोम तोम’ हा आलाप आणि धमार सादर करताना बढत, तानांचे अनोखे दर्शन घडवित आग्रा घराण्याच्या गायकीवरील आपले प्रभुत्व दर्शविले.
ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आयोजित स्वरानुभूती मैफलीत सादरीकरण करताना भारती प्रथाप.
‘सावरे सलोने से लागे मोरे नैन सखिरी’ ही द्रुत तीन तालातील आपले दादा गुरू उस्ताद खादिम हुसेन खान यांची रचना तयारीने पेश केली. मैफलीची सांगता उस्तात फैयाज खान यांच्या सुप्रसिद्ध ‘बनाओ बतिया चलो काहे को झुठी’ या दादऱ्याने करून रसिकांना आग्रा घराण्याच्या गायकीचे वैशिष्ट्य उलगडून दाखविले.
भारती प्रथाप यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला), मानसी पोतदार, वैभवी सुपेकर (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली. कलाकरांचा सत्कार ज्येष्ठ गायिका विदुषी सुमन नागरकट्टी, ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या चेतना कडले यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी वाठारे यांनी केले.
जाहिरात