गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ॲड. प्रमोद आडकर यांचे सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य माणुसकीच्या जगण्याचा स्रोत : डॉ. शिवाजीराव कदम.
षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे कृतज्ञता सन्मान सोहळा !
पुणे : हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आणि अंगी सळसळता उत्साह असलेले ॲड. प्रमोद आडकर साहित्य क्षेत्रात अखंड बुडालेले आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या हिऱ्यांना शोधून काढून त्यांच्या कार्याचे ॲड. आडकर उदात्त हेतूने कौतुक करीत आहेत. ते ज्या भावनेने कार्य करीत आहेत त्यामागील विचार मला भावला.
त्यांनी आपल्या कार्याने सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचा ठसा उमटविला आहे. सामाजिक जाणिवेतून ते करीत असलेले कार्य माणुकीच्या जगण्याचा स्रोत आहे, असे गौरवोद्गार भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी काढले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आयोजित सन्मान सोहळ्यात (डावीकडून) रवींद्र डोमाळे, प्रा. मिलिंद जोशी. डॉ. सदानंद मोरे, डॉ. पी. डी. पाटील, ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, डॉ. शिवाजीराव कदम, सचिन ईटकर, उद्धव कानडे
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ संयोजक, लेखक ॲड. प्रमोद आडकर यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त आज (दि. 5) कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. षष्ठ्यब्दीपूर्तीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ॲड. आडकर यांचा सन्मान डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
त्या वेळी डॉ. कदम अध्यक्षपदावरून बोलत होते. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन ईटकर, कार्याध्यक्ष उद्धव कानडे, प्रमुख कार्यवाह रवींद्र डोमाळे व्यासपीठावर होते.
महात्मा फुले पगडी, उपरणे, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते. सांस्कृतिक नगरीतील साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर या वेळी उपस्थित होते. मैथिली आडकर यांचा या वेळी डॉ. पी. डी. पाटील आणि संस्थेच्या उपाध्यक्षा सुप्रिया वाईकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डॉ. कदम पुढे म्हणाले, सामाजिक आदर्श असणाऱ्या थोर व्यक्तींचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यही ॲड. आडकर करत आहेत. समाजातील जे जे चांगले आहे ते घेत जावे आणि लोकांपर्यंत पोहोचवावे, समाजाला जागे करावे, दिशा द्यावी, मार्गदर्शन करावे असे कार्य करणारी व्यक्ती म्हणजे ॲड. आडकर आहेत.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ॲड. आडकर विविध कार्यक्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहेत. त्यांनी अनेक व्यक्तींना, संस्थांना मदत केली आहे, त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहित केले आहे. वयाच्या 28व्या वर्षापासून ते साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत हे कौतुकास्पद आहे. एका संस्थेच्या प्रमुखाचा सन्मान दुसऱ्या संस्थेने करणे ही अभिनंदनीय गोष्ट आहे.
ॲड. आडकर हाती घेतलेले कार्य स्वत:ला झोकून देऊन यशस्वी करताता असे गौरवोद्गार काढून डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ॲड. आडकर यांचे वैयक्तिक व संस्थात्मक पातळीवर अव्याहतपणे कार्य सुरू आहे. ते सर्वतंत्र-स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे कार्य पुण्याची शान वाढविणारे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात याची नक्कीच नोंद घेतली जाईल.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकत्वाचे भरणपोषण करणाऱ्या अनेक संस्थांपैकी एक संस्था ही ॲड. आडकर यांची आहे. दुसऱ्याच्या चांगुलपणाचे कौतुक पडद्यामागे राहून करणे हे ॲड. आडकर यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाटचालीत ॲड. आडकर यांचे मोलाचे योगदान आहे. समाजजीवनातून कृतज्ञता मूल्य हद्दपार होत असताना ॲड. आडकर समन्वय व सहकार्याच्या भूमिकेतून करीत असलेल्या कार्याचे मोल मोठे आहे.
सत्काराला उत्तर देताना ॲड. आडकर म्हणाले, माझ्या आयुष्यातील खडतर प्रवासात मी ठामपणे सातत्य ठेवले. माझ्या कार्यामुळे अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिंना मला भेटता आले. यातूनच मी प्रगल्भ-समृद्ध होत गेलो. आयुष्यात अनेक चांगले-वाईट अनुभव आले पण त्यातील चांगले स्वीकारात वाईट विसरत, सकारात्मकतेने अडचणींचे डोंगर पार करत मी काम करीत राहिलो.
आयुष्याच्या या उंबरठ्यावर आपण चुकलो तर खुल्या दिलाने समोरच्या व्यक्तीची माफी मागावी आणि समोरचा चुकला तर त्याला मोठ्या मनाने माफ करत पुढे जावे असा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितली. आयुष्याच्या वाटचालीत पत्नी व तुम्हा सुहृदांशिवाय मी कोणीही नाही, पत्नीने माझ्या अनेक चुका पदरात घेत मोलाची साथ दिली या विषयी मी तिचा ऋणी आहे.
सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी प्रास्ताविकात सन्मान सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका विशद केली आणि मान्यवरांचा सन्मान केला. सन्मानपत्राचे वाचन, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उद्धव कानडे यांनी केले.
जाहिरात