गोल्डन आय न्यूज नेटवर्क
अभिवाचनातून घडला आजोळाचा प्रवास !
डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘माझं आजोळ’ पुस्तकाचे विद्यार्थिनींच्या हस्ते प्रकाशन !
पुणे : ‘रविवारचा बाजार’, ‘माकड आलं माकड’, ‘बंब, गडू आणि घंगाळं’, ‘तू तू, मै मै आणि ससा’ अशा काही मजेशिर कथा अन् ‘माझी गावाकडची आजी’ या कवितेच्या अभिवाचनातून शाळकरी मुलांना आज आजोळाचा प्रवास घडला.निमित्त होते ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘पियूची वही’ या डॉ. संगीता बर्वे यांच्या गाजलेल्या पुस्तकाचा दुसरा भाग अर्थात ‘माझं आजोळ’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे.
माझं आजोळ’ पुस्तकातील कथांचे अभिवाचन करताना ओवी बनकर, सानवी तनपुरे, राही पोहनेरकर, तन्मयी अत्रे, प्रचिती पाध्ये
या पुस्तकाचा प्रकाशन समारंभही अनोख्या पद्धतीने करण्यात आला. पुण्याच्या विविध भागातील शाळांमधील विद्यार्थिनींनी पुस्तकातील निवडक कथा-कवितांचे अभिवाचन केले तसेच त्यांच्या आणि अत्रे प्रशालेतील विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले.
दिवाळी पूर्वसंध्या, पु. ल. देशपांडे आणि सुधाकर प्रभू यांच्या जन्मदिनाचे औचित्य आणि येऊ घातलेला बालदिन या निमित्ताने आज (दि. 8) आबासाहेब अत्रे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचनकक्षात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माझं आजोळ’ पुस्तक प्रकाशन प्रसंगी विद्यार्थिनींसह सत्यभामा पानसरे, दीपमाला धायगुडे, प्रसाद भडसावळे, डॉ. संगीता बर्वे, मिलिंद परांजपे.
पुस्तकाच्या लेखिका डॉ. संगीता बर्वे, प्रकाशन मिलिंद परांजपे, अत्रे प्रशालेच्या प्राचार्या दीपमाला धायगुडे, संदर्भ ग्रंथपाल व माहितीतज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राही पोहनेरकर (नवीन मराठी शाळा), सानवी तनपुरे (जे.एस.पी.एम. शाळा, नऱ्हे), ओवी बनकर (हुजुरपागा शाळा, कात्रज), तन्मयी अत्रे (ज्ञानप्रबोधिनी शाळा) आणि प्रचिती पाध्ये (एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल) या विद्यार्थिनींनी कथा आणि कवितांचे प्रभावीपणे अभिवाचन केले.
‘पियूची वही’ या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला, मुलांनी पुस्तकावर उत्तम अभिप्राय दिले. अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे या पुस्तकाचे वाटपही करण्यात आले, यामुळे ‘माझं आजोळ’ या पुस्तकाच्या लेखनासाठी हुरूप आला असल्याचे डॉ. संगीता बर्वे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले. छान छान गोष्टी वाचा, लिहा त्यावर सादरीकरण करा असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मिलिंद परांजपे म्हणाले, उत्साहाने भारलेले शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून खूप आनंद होत आहे. कुमारवयीन मुलांना लेखनासाठी उद्युक्त करण्यास ‘पियूची वही’, ‘माझं आजोळ’ अशा स्वरूपाची पुस्तके नक्कीच उपयुक्त ठरतील.कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना प्रसाद भडसावळे प्रास्ताविकात म्हणाले, शाळेच्या वाचनकक्षात विविध उपक्रम साजरे व्हावेत, मुले लिहिती व्हावीत, त्यांना वाचनातून आनंद मिळावा या करिता अभिनव पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला.
सिल्व्हर क्रेस्टच्या ग्रंथपाल आशा थोरात, हुजुरपागा शाळेतील शिक्षिका मोनाली तनपुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
उपस्थितांचे स्वागत दीपमाला धायगुडे, प्रसाद भडसावळे यांनी तर सूत्रसंचालन सत्यभामा पानसरे यांनी केले. प्रतिभा भडसावळे यांनी अत्रे प्रशालेत आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेतली होती.
या कार्यशाळेत तयार करण्यात आलेले आकाशकंदील देऊन अभिवाचन करणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रवीण सुपे, विजय सूर्यवंशी, सोमनाथ भगत, अश्विनी दिघे, किरण जगताप, उत्तम साळवे, डॅनियल सूर्यवंशी उपस्थित होते.
जाहिरात