गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नाटक जीवन जगायला शिकविते : डॉ. प्रविण भोळे
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित अभिनय अभ्यासक्रम प्रमाणपत्राचे वितरणसुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ.
पुणे : आजच्या स्पर्धेच्या, धकाधकीच्या, माणूस तुटण्याच्या काळात समुदायाने सादर केले जाणारे नाटक जगण्यासाठी उभारी देते. नाटकाच्या मंचावर कलाकार प्रत्यक्ष एकत्र येत असल्यामुळे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला समजून घेणे, सावरून घेणे, सहकलाकाराच्या भावनांचा विचार करणे या क्रियांचा उपयोग वैयक्तिक आयुष्य जगतानाही होतो.
सुमन नाट्यछटा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसमवेत डॉ. प्रविण भोळे, अभिनेते धनंजय सरदेशपांडे, प्रकाश पारखी.
नाटक खऱ्या अर्थाने जीवन जगायला, जीवनाकडे नव्या दृष्टीने पहायला शिकविते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रविण भोळे यांनी केले.नाट्यसंस्कार कला अकादमी आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आणि ज्येष्ठ लेखिका कै. सुमनताई शिरवटकर स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 5) सरिता विद्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
त्या वेळी डॉ. भोळे बोलत होते. अभिनेते, दिग्दर्शक धनंजय सरदेशपांडे, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी, ललित कला केंद्राच्या अभ्यासक्रम समन्वयक अश्विनी आरे व्यासपीठावर होते.
डॉ. भोळे म्हणाले, मराठी रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या दिग्गजांमध्ये नाट्यछटाकार दिवाकर यांचे स्थान मोठे आहे. त्यांच्या नाट्यछटा समग्रपणे अभ्यासल्यावर त्यांचा काळाच्या पुढे असणारा दृष्टीकोन पाहून स्तिमित व्हायला होते. दिवाकरांच्या नाट्यछटांचा विद्यार्थ्यांनी जरूर अभ्यास करावा.
धनंजय सरदेशपांडे म्हणाले, नाट्यक्षेत्रात सातत्याने वेगवेगळ्या शक्यता पडताळणे आणि नवीन काहीतरी करून बघणे गरजेचे असते. अभ्यासक्रमाने विद्यार्थ्याला दिशा सापडते; परंतु त्याचा मार्ग त्यानेच शोधणे आवश्यक असते. नाटकाच्या प्रक्रियेतून आनंद घेणे ही खरी जगण्यातील गंमत आहे.
प्रकाश पारखी म्हणाले, नाटकासाठी चांगला प्रेक्षक मिळणे ही काळाची गरज झाली आहे. बालरंगभूमीवर कार्यरत असल्याने उत्तम प्रेक्षक घडविणे शक्य झाले आहे. नाट्यछटा प्रकार सर्व वयोगटात रुजावा यासाठी गेली 33 वर्षे नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.प्रास्ताविक अश्विनी आरे यांनी केले तर आभार संध्या कुलकर्णी यांनी मानले. तांत्रिक सहाय्य प्रतिक पारखी यांनी केले
.
सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेचा सविस्तर निकाल
गट क्रमांक एक : प्रथम आरोही मंदार देशपांडे (मलाही आलयं टेन्शन), द्वितीय रियान सचिन लेले (मिस्टर गोडबोले).
गट क्रमांक दोन : प्रथम सानिका मकरंद कुलकर्णी (कोण घाबरतो भुताला), द्वितीय आर्या अमोल कुलकर्णी (आळस माझा मित्र), उत्तेजनार्थ स्वानंदी आनंद बाबरेकर (संस्कृतम्).
गट क्रमांक तीन : प्रथम प्रसन्न प्रदीप सोहनी (दरड), द्वितीय सायली पुष्कर पानसे (अरे संसार संसार), तृतीय स्वप्निल मधुकर विलनकर (बिचारी मिनी), उत्तेजनार्थ राधिका देशपांडे (आत्मविश्वास), सायली पुष्कर पानसे (अभ्यास), शिल्पा पराग कुलकर्णी (फेसबुक वरचे प्रश्न), तृप्ती सकुंडे (हाफ तिकीट).
गट क्रमांक चार : प्रथम वैजयंती जयंत दिवेकर (22व्या शतकात), द्वितीय अतुल दिवाकर (गौरी गणपती आगमन).
जाहिरात