गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मारकाचा पुणे दर्शनमध्ये समावेशकरावा : चंद्रकांत पाटील !
फडके स्नेहवर्धिनीतर्फे करण्यात आलेल्या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मारकाच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण !
पुणे : जो देश आपली उज्ज्वल परंपरा विसरतो त्या देशाला भवितव्य राहात नाही. देशाची शौर्याची, त्यागाची अभिमानास्पद परंपरा विसरली जावी यादृष्टीने ब्रिटिश राज्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये मानसिकता प्रस्थापित केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीच मानसिकता त्या काळातील राज्यकर्त्यांनी पुढे नेली आणि मूळ परंपरेची ओळख पुढील पिढीला होऊ दिली नाही, अशी टीका उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाचा पुणे दर्शनमध्ये समावेश करावा, असा आदेशही त्यांनी या प्रसंगी महापालिका प्रशासनाला दिला.फडके स्नेहवर्धिनी पुणे, पुणे पोलीस कार्यालय (सीआयडी, संगम ब्रिज) अधिकारी व सहकारी यांच्या सहकार्यातून व महा मेट्रो रेल्वे यांच्या योगदानातून संगम ब्रिज येथे आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक, भित्तीशिल्पे व जतन करून ठेवलेली कोठडी तसेच भोवतालच्या संपूर्ण परिसरामध्ये दुरुस्ती व सुशोभिकरणाचे लोकार्पण आज (दि. 4) मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
त्या वेळी ते बोलत होते. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सीआयडीचे माजी संचालक जयंत उमराणीकर, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, महा मेट्रोचे अतुल गाडगीळ, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेविका रुपाली धाडवे, फडके स्नेहवर्धिनीचे अध्यक्ष बंडोपंत फडके, उपाध्यक्ष नंदकिशोर फडके, कार्यवाह अभिजित फडके, दि. गो. फडके व्यासपीठावर होते.
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना ब्रिटिश सरकारने ज्या कोठडीत आठ महिने बंदिवासात ठेवले होते त्या कोठडीस भेट तसेच फडके यांच्या कार्याविषयी माहिती देणारी भित्तीशिल्पे यांची पाहणी करून आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस सुरुवातीस पाटील यांनी अभिवादन केले.
फडके स्नेहवर्धिनी पुणे आयोजित कार्यक्रमात आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करताना चंद्रकांत पाटील व फडके स्नेहवर्धिनी पुणेचे पदाधिकारी.
पाटील पुढे म्हणाले आद्यक्रांतिकारण वासुदेव बळवंत फडके स्मारक, आंबेगाव येथील शिवसृष्टी तसेच आर. के. लक्ष्मण यांची बाणेर येथील प्रदर्शनी यांचा समावेश पुणे दर्शनमध्ये व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाला आदेश देतो. भविष्यात फडके स्मारकाची वाटचाल कशी असावी या दृष्टीने मंत्री पाटील यांनी फडके स्नेहवर्धिनीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
जयंत उमारणीकर म्हणाले, स्वातंत्र्य लढ्याच्या काळात पुण्यात झालेल्या क्रांतिकारकांच्या कार्याविषयीची माहिती संकलित करून या वास्तूच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती पोहोचवावी.
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाचा पुणे दर्शनमध्ये सहभाग व्हावा, मोलाचा वारसा जतन व्हावा यासाठी देखभाल व्यवस्था आणि संग्रहालयासाठी शासनाने निधी द्यावा, अशी विनंती संस्थेचे कार्यवाह अभिजित फडके यांनी केली.
या प्रसंगी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी उद्बोधन केले.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष बंडोपंत फडके यांनी फडके स्नेहवर्धिनीच्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत बंडोपंत फडके, वि. गो. फडके, अभिजित फडके, द. वा. फडके, मोहन शेटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष नंदकिशोर फडके यांनी मानले. संपूर्ण वंदेमातरम गीत केदार फाटक यांनी सादर केले.
जाहिरात