गोल्डन आय न्यूज नेटवर्क
लावणी नृत्य आज झालंय ‘कवायत नृत्य’ : लीला गांधी
अभिनय-नृत्य कारकिर्दीला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे विशेष सन्मान !
पुणे : लावणी हा नृत्यप्रकार तुच्छ नाही. लावणीतील श्रृंगारातून रसिकांपर्यंत शब्दातील आशय पोहोचविणे आवश्यक असते. मात्र आज लावणी हा कवायत नृत्य प्रकार झाला असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना लीला गांधी यांनी व्यक्त केली.
रंगमंचावर, चित्रपटाच्या पडद्यावरील सादरीकरणासाठी प्रामाणिकपणे कष्ट केले त्यांची फळे आज उपभोगत आहे, अशी प्रांजळ भावनाही त्यांनी व्यक्त केली.
गांधी यांच्या अभिनय-नृत्य कारकिर्दीला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांचा आज (दि. 3) विशेष सन्मान सोहळ्याचे पत्रकार भवन येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या.
रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित सत्कार समारंभात (डावीकडून) ॲड. प्रमोद आडकर, लीला गांधी, मनिषा साठे, मैथिली आडकर.
लीला गांधी यांचा सत्कार कथक नृत्यगुरू पंडिता मनिषा साठे यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर व्यासपीठावर होते.
पितृतुल्य असलेल्या अनंतराव माने यांच्यामुळे चित्रपटात नृत्याची संधी मिळाली. कॅमेऱ्यासमोर कसे बोलावे, कसे पहावे यांचे बहुमोल प्रशिक्षण त्यांनी मला दिले. कष्ट आणि प्रमाणिकपणे केलेल्या कामाचे चिज झाले असून मी आजही रसिकांच्या लक्षात आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
श्रृंगार आणि अश्लिलता यात एक तरल अस्पष्ट रेषा असते. लीला गांधी यांनी लावणी या नृत्यप्रकाराला प्रतिष्ठा देण्याचे काम केले, असे मत पंडिता मनिषा साठे यांनी व्यक्त केले. त्यांच्या मंच-पडद्यावरील अदा, नटखटपणा नैसर्गिक होता. त्यामुळे त्यांच्या नृत्यावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले. त्यांचे स्थान माझ्या हृदयात आहे.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रतिष्ठानच्या वाटचालीचा आढावा सादर केला. पंडिता मनिषा साठे यांचा सत्कार मैथिली आडकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘लावण्य’ हे लावण्यांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
त्यात जयंत भिडे, श्रीनिवास शारंगपाणी, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, अश्लेषा महाजन, चंद्रकांत धस, सुजाता पवार, वासंती वैद्य, रुपाली अवचरे, डॉ. राजश्री महाजनी, डॉ. रेखा देशमुख, अश्विनी पिंगळे, सीताराम नरके, विजय सातपुते, मृणालिनी कानिटकर-जोशी यांचा सहभाग होता. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती रहाळकर यांनी केले.
जाहिरात