गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भालबा केळकर नाटिका स्पर्धेसाठी 28 तर राजा नातू करंडक स्पर्धेसाठी 26 शाळांचा सहभाग !
पुणे : भालबा केळकर नाटिका स्पर्धेसाठी 28 तर राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेसाठी 26 शाळांनी सहभाग नोंदविला आहे.या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक प्रतिनिधींसीठी आज (दि. 10) नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्पर्धेचे प्रवेश अर्जही स्वीकारण्यात आले.
नाट्य कार्यशाळेत सहभागी शिक्षक प्रसंगनाट्य सादर् करताना
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे यंदाचे 31वे तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 11 ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत तर पाचवी ते दहावी या इयत्तेतील मुलांसाठी राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धा 15 ते 24 जानेवारी 2024 या कालावधीत भरत नाट्य मंदिरात घेतली जाणार आहे.
स्पर्धेचे लॉटस् जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहेत.भालबा केळकर आणि राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक प्रतिनिधींसाठी इंदिरा मोरेश्वर सहभागृहात नाट्य कार्यशाळा घेण्यात आली. बालरंगभूमी आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री अंजली कराडकर यांनी शिक्षक प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
मुलांच्या वयोगटानुसार लेखन कसे असावे, गोष्ट फुलविताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत तसेच दिग्दर्शक म्हणून कोणत्या गोष्टींवर भर द्यावा याविषयी त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांचे नाट्यविषयक खेळही घेण्यात आले.
जाहिरात