गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंचशीलातील तत्त्वांचा अंगिकार केल्यास शांतता नांदेल : डॉ. राम खर्चे !!
आडकर फौंडेशनतर्फे महेंद्र भारती यांचा धम्मक्रांती पुरस्काराने गौरव !
पुणे : संपूर्ण जगाला गौतमबुद्धांनी शांततेचा संदेश दिला. धम्माचे तत्त्वज्ञान विपश्यनेद्वारे शिकायला मिळते. जो पर्यंत आपण स्वत:मध्ये परिवर्तन घडवत नाही, स्वत:मधील विकार दूर करीत नाही, पंचशीलातील तत्त्वांचा अंगिकार करीत नाही तोपर्यंत विश्वात शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व विधिज्ञ डॉ. राम खर्चे यांनी केले.
आडकर फौंडेशनतर्फे बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांना आज (दि. 10) धम्मक्रांती पुरस्कार डॉ. खर्चे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, ज्येष्ठ संपादक व लेखक अरुण खोरे, ज्येष्ठ कवी, लेखक उद्धव कानडे, महामाता रमाई महोत्सवाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. शाल, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
आडकर फौंडेशन आयेजित धम्मक्रांती पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) उद्धव कानडे, ॲड. प्रमोद आडकर, महेंद्र भारती डॉ. राम खर्चे, अरुण खोरे, विठ्ठल गायकवाड
बाबा भारती यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असलेल्या महेंद्र भारती यांची धम्मक्रांती पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य असल्याचे डॉ. खर्चे म्हणाले.संसदीय लोकशाही पद्धतीला संकुचित करण्याचे सध्या प्रयत्न सुरू असल्याचे अरुण खोरे म्हणाले. गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचाराने चालल्यास खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल, असे खोरे म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेल्या बाबा भारती यांच्या कार्याचा विस्तार झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याचे ॲड. प्रमोद आडकर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात सांगितले.
समतेचा विचार धम्मपदात असल्याचे उद्धव कानडे म्हणाले. माणसाने स्वत:मध्ये सुगंध भरला तर जग शांततेच्या मार्गाने पुढे जाईल, असेही त्यांनी सूचित केले.सत्काराला उत्तर देताना महेंद्र भारती म्हणाले, धम्म विचारसरणीला अनुसरून जीवन जगत आलो आहे. विठ्ठल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. रुपाली अवचरे यांनी केले.
जाहिरात