गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मुत्सद्देगिरी, ज्ञान आणि पराक्रमाच्या जोरावर पानसे घराण्याने उमटविला ठसा : पांडुरंग बलकवडे !
सरदार पानसे मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात पानसे घराण्याच्या इतिहासाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन के. एस. पानसे आणि राजीव पानसे यांचा पानसे कुलभूषण पुरस्काराने गौरव!
पुणे : हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासून ते हिंदवी स्वराज्याच्या अखेरपर्यंत पानसे घराण्याने खूप मोठे योगदान दिलेले आहे. आपली मुत्सद्देगिरी, ज्ञान आणि त्याच बरोबर आपल्या समशेरीच्या जोरावर पराक्रमाचा ठसा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये उमटविला आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी काढलेत.
सरदार पानसे घराण्याच्या पानसे मंडळाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आणि सरदार पानसे घराण्याच्या इतिहासाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन बलकवडे यांच्या हस्ते आज (दि. 8) झाले. त्या वेळी ते ‘पानसे घराण्याचे महाराष्ट्रातील इतिहासात योगदान’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. गणेश सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे माजी मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक के. एस. पानसे आणि ऑटो कॉम्प इंडस्ट्रीजचे संचालक, प्रसिद्ध उद्योजक राजीव पानसे यांचा पानसे कुलभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सरदार पानसे मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरदार पानसे घराण्याच्या इतिहासाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित राजीव पानसे, डॉ. जयंत पानसे, पांडुरंग बलकवडे, डॉ. अनिल माधव पानसे, अनिल श्रीधर पानसे, अपर्णा पानसे.
पानसे मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयंत पानसे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल माधव पानसे, अनिल श्रीधर पानसे व्यासपीठावर होते.
पानसे घराणे मूळ कर्नाटकातील, पण चौदाव्या शतकात पानसे महाराष्ट्रात आले. कर्नाटकातून महाराष्ट्रात झालेले आगमन, छत्रपती शहाजी महराजांपासून ते पेशवे यांच्यापर्यंत पानसे घराण्यातील पराक्रमी वीरांचा इतिहास या वेळी बलकवडे यांनी उलगडून दाखविला. कर्नाटकाच्या मोहिमेत, हैदर आणि टिपू यांचा बंदोबस्त करण्यात, निजामावर केलेल्या स्वारीत, सरदार माधवराव पानसे, जयवंतराव पानसे, सखारामपंत पानसे यांच्या शौर्याची उदाहरणे त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ऑटो कॉम्प इंडस्ट्रीजचे संचालक, प्रसिद्ध उद्योजक राजीव पानसे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नोकरी करता करता व्यवसायाची बिजे कशी रोवली गेली आणि व्यवसायात यशाचे शिखर कसे गाठले याविषयी त्यांनी थोडक्यात विवेचन केले. देशपरदेशात आलेले अनुभवही त्यांनी कथन केले.
सरदार पानसे मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पानसे कुलभूषण गौरव सोहळ्यात डॉ. जयंत पानसे, राजीव पानसे, के. एस. पानसे, डॉ. अनिल माधव पानसे, पांडुरंग बलकवडे, अनिल श्रीधर पानसे.
गुणवत्तापूर्ण उत्पादन केलेल्या उद्योग व्यवसायासाठी जगाची बाजारपेठ खुली असल्याचे त्यांनी नमूद केले. सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला.सत्काराला उत्तर देताना के. एस. पानसे यांनी मंडळाची वाटचाल आणि पानसे भवनाची निर्मिती कशा पद्धतीने झाली याचा उलगडा केला.
स्वागतपर प्रास्ताविक डॉ. जयंत पानसे यांनी केले तर पानसे कुलभूषण पुरस्काराविषयीची माहिती डॉ. अनिल पानसे यांनी दिली. पुरस्कारार्थींचा परिचय आणि मानपत्र वाचन मनिषा पानसे यांनी केले. पानसे मंडळाच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. गोपाळ पानसे, रमेश पानसे, ॲड. विश्वास पानसे, विजय बक्षी, सीताराम पानसे, मधुकर पानसे, सुजाता पानसे, सायली पानसे यांचा मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अपर्णा पानसे यांनी नृत्याद्वारे गणेशस्तवन सादर करून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा पानसे आणि अपर्णा पानसे यांनी केले. आभार आनंद पानसे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुरेल संगीत सभा आयोजित करण्यात आली होती यात सायली पानसे-शेल्लेकरी, अंजली पानसे, शौनक पानसे, स्वरदा गोखले-गोडबोले यांचा सहभाग होता.
जाहिरात