गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मराठी रंगभूमीच्या अमृतमहोत्सवानिमित्त अ ायोजित संगीत नाट्यमहोत्सवाला सुरुवात !!
पुणे : गंधर्वभूषण जयराम शिलेदार आणि जयमालाबाई शिलेदार यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित संगीत नाट्यमहोत्सवाला आज (दि. 30) रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात झाली. विद्याधर गोखले लिखित संगीत सुवर्णतुला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आले.
‘मराठी रंगभूमी, पुणे’ ही संस्था एक ऑक्टोबर रोजी 75व्या अर्थात अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्त गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्टतर्फे संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले.
गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत संगीत नाट्यसेवा ट्रस्ट आयोजित संगीत नाट्यमहोत्सवाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना उल्हास पवार. समवेत दीप्ती भोगले, वर्षा जोगळेकर.
मराठी रंगभूमी, पुणेच्या अध्यक्ष दीप्ती भोगले, वर्षा जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार यांचे स्वागत दीप्ती भोगले यांच्या हस्ते करण्यात आले.बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात सुबक रांगोळी रेखाटण्यात आली होती. रसिकांचे स्वागत सनई-चौघडा वादनाने करण्यात आले.
संस्थेच्या 75 वर्षांच्या वाटचालीचा आढावा चित्ररूपी प्रदर्शनातून मांडण्यात आला होता. कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाल्याने प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला.
रविवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र हे नाटक सादर होणार आहे. संगीत नाट्यमहोत्सवाचा सांगता समारंभ सोमवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत संगीत नाट्यसेवा ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात संगीत सुवर्णतुला नाटकातील एक क्षण.
संगीत रंगभूमीची दीर्घकाळ सेवा करणारे ज्येष्ठ ऑर्गन वादक संजय देशपांडे आणि युवा तबलावादक रोहन भडसावळे यांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. त्यानंतर गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशयकल्लोळ नाटकाचा प्रयोग होणार आहे.
जाहिरात