गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे रविवारी ‘छंद देई आनंद’ नृत्य-नाट्य-काव्याविष्कार !
पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित रविवार सत्र नाट्य कार्यशाळेच्या समारोप समारंभानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त एकनाथ आव्हाड यांच्या काव्यसंग्रहावर आधारित ‘छंद देई आनंद’ हा नृत्य-नाट्य-काव्याविष्कार रविवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम दुपारी 12:30 वाजता सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ येथे होणार आहे. नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे 5 ते 8 आणि 9 ते 16 वयोगटातील मुलांसाठी रविवार सत्र नाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी कार्यक्रम सादर करणार आहेत.
संध्या कुलकर्णी, दीप्ती असवडेकर, अनुराधा कुलकर्णी, राधिका देशपांडे, अंजली दफ्तरदार यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू सांभाळली आहे. आव्हाड यांच्या ‘छंद घेई आनंद’ या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानिमित्त त्यांचा अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
अशी माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी निवेदनाद्वारे दिली. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात