गोल्डन आय न्यूज नेटवर्क
राहुल देशपांडे यांच्या सादरीकरणातून घडले पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन !!
स्वरझंकार व इंडेको प्रायमस आयोजित ‘कुमार रागविलास’ मैफलीत रसिकांना आली अनुभूती .
पुणे : युगप्रवर्तक, विख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन पुणेकर रसिकांना घडले. निमित्त होते स्वरझंकार व इंडेको प्रायमस यांच्या वतीने ‘कुमार रागविलास’ या सांगीतिक मैफलीचे.पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
पंडित कुमार गंधर्व यांनी बांधलेल्या बंदिशींचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी रसिकांशी संवाद साधत केलेले सादरीकरण मैफलीचे वेगळेपण ठरले. राहुल देशपांडे यांनी मैफलीची सुरुवात राग श्रीने केली. ‘पावा मय दुरासे’, ‘रिसई काहे’ आणि ‘करन देरे कछुलला’ या तीन बंदिशींचे सादरीकरण केले. त्यानंतर कल्याण रागातील बंदिशी सादर केल्या.
स्वरझंकार व इंडेको प्रायमस आयोजित ‘कुमार रागविलास’ मैफलीत सादरीकरण करताना राहुल देशपांडे. समवेत निखिल फाटक (तबला) आणि चैतन्य कुंटे (हार्मोनियम) साथसंगत करताना.
‘बैठी हुं अकेली’, ‘केदार नंदा’, ‘ला दे बिरा माने चुनरी’, या केदार रागातील संवादात्मक असलेल्या बंदिशींद्वारे देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे वेगळेपण रसिकांसमोर सादरीकरणातून प्रस्तुत केले. चैत्रातील निसर्गाचे दर्शन घडविणारी‘मालकंस’मधील ‘सब भये सोहर’ ही रचना सादर केल्यानंतर ‘धन बसंती’, ‘दीप की ज्योत जले’ तसेच ‘म्हारुजी भुलोनो माने’ या रचना सादर केल्या.
पंडित कुमार गंधर्व यांची गायकी कशी होती, रागांबद्दल त्यांचे काय विचार होते या विषयी राहुल देशपांडे यांनी विवेचन करत गायन प्रस्तुतीतून रसिकांना अचंबित केले. निसर्गाचे वर्णन करणाऱ्या, सणांची महती सांगणाऱ्या रचनाही त्यांनी ऐकविल्या. भैरवीतील टप्पा आणि निर्गुणी भजन सादर करून राहुल देशपांडे यांनी मैफलीची सांगता केली. त्यांना चैतन्य कुंटे (हार्मोनियम) आणि निखिल फाटक (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली.
कार्यक्रमाची संकल्पना चैतन्य कुंटे यांची होती.
रसिकांशी संवाद साधताना राहुल देशपांडे म्हणाले, कुमारजींच्या प्रत्येक बंदिशीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जे मांडायचे ते मोजक्या शब्दात मांडत. त्या व्यतिरिक्त काही मांडायचे असल्यास ते दुसऱ्या बंदिशीची रचना करत. कुमारजींच्या बंदिशी जशा लिहिलेल्या आहेत त्या तशाच्या तशा गाण्यात मजा आहे,
कारण कुमारजींची प्रत्येक मात्रा बांधलेली आहे, त्यामुळे त्यात छेडखानी करणे शोभून दिसत नाही. कुमारजींचे गायन ऐकून भारावून गेल्याने आपण संगीत क्षेत्राकडे ओढले गेलो असल्याचा राहुल यांनी आवर्जून उल्लेख केला.मैफलीच्या आयोजनाविषयी माहिती देताना प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये म्हणाले, आम्ही ज्या कलाकारांना पाहिले आणि ज्यांनी आम्हाला घडविले अशा थोर कलाकारांपैकी एक म्हणजे पंडित कुमार गंधर्व होय. ते संत होते, त्यांचे व्यक्तिमत्त्व ऋषितुल्य होते.
त्यांच्याकडे मी प्रत्यक्ष शिकलो नसलो तरी हे थोर कलाकार माझे परात्पर गुरूच आहेत. त्यांचे आशीर्वाद मला लाभले, त्यांचा परिसस्पर्श झाला हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘कुमार रागविलास’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भविष्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे.
‘स्कोडा’ आदित्य मोटर्स तसेच 94.3 रेडिओ वन एफएम यांचे सहकार्य लाभले.
जाहिरात