गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संत चोखामेळा साहित्य संमेलन तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरेल!!
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी .
संमेलनाच्या भित्तीपत्राचे अनावरण !
पुणे : संतांनी आपल्या कृतीतून, आचारणातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. संत विचाराच समाजाचे तारणहार असल्याने संत विचारांना अनुसरून आपली वाटचाल सुरू आहे. आळंदी या तीर्थक्षेत्रस्थानी पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. हे संमेलन तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन दि. 18 व 19 नोव्हेंबर 2023 रोजी आळंदी येथे होत आहे. संमेलनाच्या भित्तीपत्राचे अनावरण आज (दि. 14) कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. विद्यापीठातील कुलगुरूंच्या दालनात भित्तीपत्राचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला
संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या भित्तीपत्राच्या अनावरण प्रसंगी उपस्थित (डावीकडून) सोपानराव जाधव, प्रा. माणिकराव सोनवणे, डॉ. दीपक चांदणे, हभप माणिकबुवा मोरेमहाराज, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, सचिन पाटील, डॉ. ओम श्रीश श्रीदत्तोपासक, सिद्धेश्वर माने, वल्लभ केनडेकर, उमाकांत माने.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष देहू येथील जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह. भ. प. माणिकबुवा मोरेमहाराज होते. संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक आणि संमेलनाचे मुख्य समन्वयक सचिन पाटील, पुणे.
विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. ओम श्रीश श्रीदत्तोपासक, रवींद्र शिंगणापूरकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. माणिकराव सोनवणे, डॉ. दीपक चांदणे, उमाकांत माने, सिद्धेश्वर माने, वल्लभ केनवडेकर, सोपानराव जाधव, अमोल निकाळजे, ॲड. रोहित मुंढे, आशिय यादव आदी उपस्थित होते.
ह. भ. प. माणिकबुवा मोरेमहाराज म्हणाले, संतसाहित्यालाही संघर्षाची पार्श्वभूमी आहे. तरुणांनी निराशावादी वृत्ती दूर सारून मार्गक्रमण करण्याची गरज आहे. परमार्थापासून तसूभरही दूर न जाता संतांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करावी. संत चोखामेळा साहित्य संमेलन तरुणांना दिशादर्शक ठरेल. संत विचारांचा अभ्यास करणे ही खरेतर जगाची गरज आहे.
प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रा. माणिकराव पाटील यांनी मानले.
जाहिरात